सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदार संघात (Dindori Loksabha Constituency) विजयी उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावाशी साधर्म्य आसलेल्या 68 वर्षीय व्यक्तीला अपक्ष म्हणून उभं करण्यात आलं होतं. तर सध्या सुरू असलेल्या शिक्षक मतदार संघात (Teachers Constituency) सुद्धा याची पुनरावृत्ती केली जात आहे. नावाशी साधर्म्य असलेले एक नव्हे दोन नव्हे चक्क चार उमेदवारांनी अर्ज भरला आहे. यामुळे शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन गटात हाणामारी झाली.
नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तींनी भरला अर्ज
शुक्रवार शिक्षक मतदार निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. यामुळे उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होती. नाशिक शिक्षक मतदार संघात अर्ज भरण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात सुद्धा मोठी गर्दी होती. शेवटच्या दिवसापर्यंत नाशिक शिक्षक मतदार संघात 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत. यात तीन उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या चार जणांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे. यात नगरचे विवेक कोल्हे यांचा एक किशोर दराडे यांचा दोन तर संदीप गुळवे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
शेवटच्या दिवशी झाली हाणामारी
शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे शिक्षक मतदार संघासाठी अर्ज दाखल केला. याचवेळी त्यांच्या नावाशी साधर्म्य असणारे कोपरगावचे किशोर प्रभाकर दराडे यांनीही अर्ज दाखल केला. किशोर प्रभाकर दराडे यांनी अन्य उमेदवाराने अर्ज दाखल करू नये, माघार घ्यावी, यासाठी दबावतंत्राचा अवलंब करीत धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मतदारांचा होतो संभ्रम
लोकसभा निवडणुकीतही दिंडोरी मतदार संघात भास्कर भगरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या बाबू भगरे यांनी अर्ज भरला होता. भास्कर भगरे यांचे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस होता तर बाबू भगरे यांचे चिन्ह तुतारी होतं. यामुळे मतदारांचा संभ्रम झाला. बाबू भगरे यांना1 लाखाच्या वर मत मिळाली. दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे पेशाने सर आहेत. तर बाबू भगरे यांच्या नावापुढे सर असे लावण्यात आल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत चिन्ह नसल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुशिक्षित असलेल्या शिक्षक मतदारांना खूप जाणीवपूर्वक मतदान करावं लागणार आहे.