Kabhi Khushi Kabhie Gham : शाहरुख खान आणि काजोल यांच्या जोडीमुळं गाजलेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी अफलातून की हे प्रत्यक्ष आयुष्यातही एकमेकांचे पार्टनर असावेत अशीही काही चाहत्यांची इच्छा. अशा या जोडीनं गाजवलेला आणि तगडी स्टारकास्ट असणारा एक चित्रपट म्हणजे 'कभी खुशी कभी गम'.
करण जोहरच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन, करीना कपूर खान, शाहरुख खान आणि काजोल, फरिदा जलाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका. याच मल्टीस्टारर चित्रपटातून काही बालकलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यातही कमाल लोकप्रियता मिळवून गेला तो म्हणजे शाहरुख खान आणि काजोलच्या मुलाची भूमिका साकारणारा तेव्हाचा बालकलाकार जिब्रान खान. हा तो जिब्रान आहे, ज्यानं सुष्मिता सेन आणि गोविंदाच्या 'क्योंकी मैं झूठ नही बोलता' या चित्रपटातही बालकलाकाची भूमिका साकारली होती.
तेव्हा आपल्या गोड गोंडस रुपानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा जिब्रान, आता मोठा झाला असून तितकाच हॅण्डसमही दिसू लागला आहे. जिब्राननं वयाच्या आठव्या वर्षी K3G मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं गोतं. याव्यतिरिक्त तो 'रिश्ते' चित्रपटातूनही झळकला होता. कलाजगतातील या पदार्पणानंतर जिब्राननं त्याच्या शिक्षणावर भर दिला आणि त्यानंतर शामक दावर डान्स इन्स्टीट्युटमध्ये तो प्रशिक्षक म्हणून रुजू झाला.
जिब्राननं नृत्य क्षेत्रात त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यानं स्वत:मध्येही इतके बदल केले की पाहणारे हैराण आणि तरुणी घायाळ झाल्या. जिब्राननं करण जोहरच्या निर्मिती संस्थेसह काम केलं आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी त्यानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं.
जिब्रान सोशल मीडियावर बराच सक्रीय असून तो सातत्यानं फिटनेस आणि डाएटसंदर्भातील पोस्ट, स्टोरी शेअर करत असतो. पिळदार शरीरयष्टीसाठी कसून व्यायाम करणाऱ्या जिब्राननं आतापासूनच त्याचा चाहता वर्ग निर्माण केला असून, येत्या काळात 'इश्क विश्क रिबाऊंड' चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.