मोठी बातमी| ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन

वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Updated: Oct 2, 2021, 07:43 PM IST
मोठी बातमी| ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन title=

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक द. मा, मिरासदार यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. एकापेक्षा एक साहित्य आणि त्यांनी लिहिलेलं लेखन आजही तितकंच जिवंत वाटणारं आहे.  साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार यांसारखे पुरस्कार मिळवलेल्या ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यामुळे साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक द. मा, मिरासदार यांच्याकडे उत्तम कथाकथन कऱण्याची शैली होती. त्यांनी महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमही केले आहेत. मराठीतले विनोदी लेखक आणि कथाकथनकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या नावावर 24 कथासंग्रह आणि 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 

हुबेहूब, विरंगुळा, स्पर्श, मिरासदारी, भोकरवाडीच्या गोष्टी हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. त्यांनी लिहिलेले कथासंग्रह पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह वाचकांना आवरत नाही. गप्पांगण हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. लाडाची मैना हे त्यांनी लिहिलेले वगनाट्य. जावईबुवाच्या गोष्टी आणि गाणारा मुलुख  ही पुस्तके त्यांनी लहान मुलांसाठी लिहिली.

द मा मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी झाला होता. त्यांचं मूळ गाव पंढरपूर होतं. काही वर्ष त्यांनी पत्रकारीतेत काम केलं. त्यांनंतर औरंगाबाद तसेच पुण्यात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. विनोदी कथालेखक म्हणून द. मा. मिरासदार प्रसिद्ध आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील ते होते.