...जर त्या दिवशी सुनील दत्त आले नसते तर संजय दत्तने राजकुमार यांच्यावर हात उचलला असता

सेटवर पोहोचल्यानंतर संजय दत्तने (Sanjay Dutt) आज राजकुमार (Rajkumar) यांना मारायचं असं ठरवलं होतं. पण जेव्हा तो बाहेर आला तेव्हा तिथे त्याचे वडील सुनील दत्त (Sunil Dutt) बसलेले होते. त्यांना पाहताच संजय दत्त शांत झाला.   

शिवराज यादव | Updated: May 21, 2024, 04:59 PM IST
...जर त्या दिवशी सुनील दत्त आले नसते तर संजय दत्तने राजकुमार यांच्यावर हात उचलला असता title=

संजय दत्त त्यादिवशी राजकुमार यांना मारहाण करण्याच्या तयारीतच होता. पण त्याचवेळी सुनील दत्त तिथे पोहोचले. वडिलांना पाहिल्यानंतर संजय दत्त शांत झाला. तो काहीच बोलला नाही. जर त्यादिवशी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी प्रसंगावधन दाखवलं नसतं तर कदाचित संजय दत्त आणि राजकुमार यांच्यात फार मोठी हाणामारी झाली असती. पण नेमकं असं काय झालं होतं ज्यामुळे संजय दत्त आपल्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या राजकुमार यांच्यावर चिडला होता याबद्दल जाणून घ्या. 

झालं असं की, प्रकाश मेहरा यांनी संजय दत्तला चित्रपटासाठी कास्ट केलं तेव्हा त्याला फार चांगले डायलॉग दिले होते. राजकुमार यांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी प्रकाश मेहरा यांच्यावर दबाव टाकला. त्यातील काही डायलॉग्स आपल्याला दिले जावेत असं त्यांनी सांगितलं. तसंच संजय दत्तचा स्क्रीन टाइमही कमी करण्यास सांगितलं. 

राजकुमार फार मोठे स्टार असल्याने आणि त्यांच्यासमोर संजय दत्त फारच ज्युनिअर असल्याने प्रकाश मेहरा त्यांना नकार देऊ शकले नाहीत. त्यांनी संजय दत्तपासून ही गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण संजय दत्तला अखेर राजकुमार यांनी आपल्यासोबत काय केलं आहे याची माहिती मिळाली. य़ामुळे संजय दत्त संतापला होता. जर राजकुमार सेटवर दिसले तर आपण त्यांना मारणार असं त्याने जाहीरच करुन टाकलं. प्रकाश मेहरा यांना जेव्हा संजय दत्त राजकुमार यांच्यावर हात उलचणार असल्याचं समजलं तेव्हा त्यांनी थेट सुनील दत्त यांना फोन केला. 

प्रकाश मेहरा यांनी सुनील दत्त यांना फोन करुन संपूर्ण प्रकरण सांगितलं. त्यांनी सुनील दत्त यांना सेटवर येण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी संजय दत्त सेटवर पोहोचला तेव्हा राजकुमार यांना मारण्याच्या तयारीत होता. पण वडिल आधीच सेटवर उपस्थित आहेत हे पाहिल्यावर मात्र तो शांत झाला. सुनील दत्त यांनी संजय दत्त आणि राजकुमार यांना बोलावलं आणि दोघांमधे समेट घडवली. अशाप्रकारे त्यादिवशी सेटवर होऊ घातलेली घटना रोखण्यात आली. या चित्रपटाचं नाव आहे 'मोहब्बत के दुश्मन'. 36 वर्षांपूर्वी 20 मे 1988 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

या चित्रपटात हेमा मालिनीदेखील होत्या. तर फराह नाज संजय दत्तची अभिनेत्री होती. अमरीश पुरी यांनी चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्राण, दिना पाठक आणि ओम प्रकाश यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात एकूण सहा गाणी होती जी कल्याणजी-आनंदजींनी संगीतबद्ध केली होती. चित्रपटात किशोर कुमार यांनीही गायलेलं गाण होतं. पण चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते या जगात नव्हते. 'अल्लाह करे मौला करे' असे या गाण्याचे शब्द होते. 

प्रकाश मेहरा यांनी 1985 मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यावेळी अमन विर्क आणि मंदाकिनी या चित्रपटाचे नायक-नायिका होते. पण नंतर प्रकाश मेहरा यांनी दोघांनाही काढून टाकले आणि संजय दत्त आणि फराह नाजला कास्ट केले.