Salman Khan House Firing Case : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणाना अटक केली आहे. या अटक केलेल्या दोघांची कसून चौकशी सुरु आहे. यावेळी आरोपींनी आम्हाला सलमानच्या घरावर 40 गोळ्या चालवण्याचे निर्देश दिले होते. पण आम्ही फक्त पाच गोळ्या झाडल्या, असा गौप्यस्फोट चौकशीदरम्यान केला आहे.
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी गँगस्टर लॉरेन बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई यालाही आरोपी करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी दोन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे. आरोपींना सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपींनी 5 गोळ्या झाडल्या. तसेच 17 राऊंड जप्त केले आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करून आरोपींनी पळ काढला. त्यांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी अनेक वेळा कपडेही बदलले. जेणेकरुन पोलीस त्यांना कपड्यावरुन ओळखू नयेत. तसेच हे दोन्ही आरोपी इंटरनेटद्वारे तिसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होते. यासाठी एका आरोपीचा फोन वायफायने जोडलेला होता. विशेष म्हणजे सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना राज्याच्या बाहेरूनही मदत पुरवण्यात आली होती. राजस्थान, बिहार आणि हरियाणातून आरोपींना मदत पुरवली गेली होती. याप्रकरणी ज्यांनी आरोपींना मदत पुरवली, त्यांचाही शोध सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली आहे.
दरम्यान सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने 29 एप्रिल म्हणजेच 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पोलीस चौकशीत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट या इमारतीच्या बाहेर रविवारी (14 एप्रिल) पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती बाईकवरुन घटनास्थळी आले. त्यांनी सलमान खानच्या घराबाहेर चार राऊंड फायर केले. यानंतर ते दोघेही फरार झाले. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट शेअर केली होती. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने 72 तासात गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सध्या पोलीस हे दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.