Amruta Khanvilkar Post On Heeramandi : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची बहुचर्चित 'हिरामंडी' ही वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या या वेबसीरिजचे पोस्टर, गाणी, टीझर याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून 'हिरामंडी' या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे. आता या वेबसीरिजचा प्रीमिअर सोहळा नुकताच पार पडला. यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरने या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
'हिरामंडी' या वेबसीरिजच्या निमित्ताने संजय लीला भन्साळी यांनी एका प्रीमिअर सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याला बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरही या कार्यक्रमाला उपस्थित होती. याबद्दल तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटोही शेअर केले आहे. यातील एका फोटोत ती संजय लीला भन्साळी यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती एका सेल्फी पॉईंटजवळ बसली आहे. याला कॅप्शन देताना तिने हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे.
"संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी' ही वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतीच ही वेबसीरिज पाहिली. भन्साळी सरांचा अनुभव आणि त्यांनी घेतलेली मेहनत खरंच जबरदस्त आहेत. ही वेबसीरिज पाहण्याचा अनुभव खूपच मस्त होता. तुम्हाला खूप शुभेच्छा सर. महेश लिमये तू जादूगार आहे. तू तुझ्या कॅमेऱ्याद्वारे जे काही करतोस ते एखाद्या चित्राप्रमाणेच वाटतं आणि आशिष पाटील तुझे नाव श्रेय दिलेल्या व्यक्तींच्या यादीत पाहणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद होते. लव्ह यू", असे अमृता खानविलकरने म्हटले आहे.
अमृता खानविलकरच्या पोस्टवर आशिष पाटीलने कमेंट केली आहे. "अमू तुझे खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी तो क्षण एखाद्या स्वप्नपूर्तीप्रमाणेच होता", असे आशिष पाटीलने म्हटले आहे.
दरम्यान 'हिरामंडी' या वेबसीरिजच्या निमित्ताने संजय लीला भन्साळी हे ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'हिरामंडी' ही त्यांची पहिलीच वेबसीरिज असणार आहे. या सीरिजद्वारे स्वातंत्र्यापूर्वी वेश्यावस्तीतील जीवन कसं होतं, त्यांचा समाजात वावर कसा असायचा अशा स्त्रियांची कहाणी यातून मांडली जाणार आहे. 'हिरामंडी' ही वेबसीरिज येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरिज 190 देशात प्रदर्शित होणार असून याचे 8 भाग असणार आहेत. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेहगल या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच यात अभिनेता फरदीन खान, शेखर सुमन, ताहा शाह आणि अध्ययन सुमन हे कलाकारही झळकणार आहेत.