'दोन मुलांना एकटा बाप कसा वाढवणार?' घटस्फोटानंतर सलील कुलकर्णींना ऐकावे लागले होते टोमणे

Salil Kulkarni: सेलिब्रेटी त्यांच्या कामासोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखले जातात. सलील कुलकर्णी हे आपल्या पत्नीसोबत विभक्त झाले होते. तेव्हा त्यांना अफवांच्या आणि टोमण्यांच्या रूपात अनेक गोष्टी या सहन कराव्या लागल्या होत्या. त्याविषयी आता त्यांनी खुलासा केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 3, 2023, 05:16 PM IST
'दोन मुलांना एकटा बाप कसा वाढवणार?' घटस्फोटानंतर सलील कुलकर्णींना ऐकावे लागले होते टोमणे title=
salil kulkarni speaks on his divorce for the first time latest trending news on google

Salil Kulkarni: घटस्फोटाबद्दल कोणी सहसा मोकळेपणानं बोलायला तयार होत नाही. परंतु सध्या लोकप्रिय संगीतकार-दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी पहिल्यांदा आपल्या घटस्फोटावर मोकळेपणानं भाष्य केले आहे. गीतकार संदीप खरे यांच्यासह सलील कुलकर्णी यांचा 'आयुष्यावर बोलू काही' हा शो प्रचंड लोकप्रिय झाला होता. या लोकप्रिय कार्यक्रमाचे अनेक प्रयोगही झाले. सध्या सलील कुलकर्णी यांनी मित्र म्हणे' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या घटस्फोटावर भाष्य केले असून त्यानंतर आपल्या मुलांचा कसा सांभाळ केला यावरही सांगितले आहे. सलील कुलकर्णी यांच्या 'एकदा काय झालं' या मराठी चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यावेळी त्यांनी इन्टाग्रामवरून याबद्दल प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत. त्यांच्या आईसह त्यांनी पुरस्कारासोबत व्हिडीओ व्हायरल केला होता. 

चित्रपट, मालिका त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे आणि रिएलिटी शोजमधूनही त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. मधली सुट्टी नावाचा त्यांचा एक कार्यक्रमही झी मराठी वाहिनीवर प्रचंड लोकप्रिय झाला होता. 

2013 साली त्यांनी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्यांवेळी त्यांना आलेले अनुभव आणि त्यांच्यावर झालेली टीका यावर खूप खुलासे केले आहेत. घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल अनेक अफावाही येयला सुरूवात झाली होती. त्यावेळी त्यांनी लहान तरूण मुलीसोबत लग्न केले आहे अशी अफवा पसरली होती त्यावेळी याचा त्यांच्या कुटुंबियांनाही फारच त्रास सहन करावा लागला होता. 

यावेळी सलील म्हणाले की, ''जेव्हा मी माझ्या पत्नीपासून वेगळा झालो तेव्हा माझ्याबद्दल बरीच चर्चा झाली. आपल्या दोन मुलांना एकटा बाप कसा वाढवणार आहे हे समजून घेण्याइतका समजूतदारपणा लोकांमध्ये का नसतो? मी या गोष्टींचा अजिबात त्रागा करत नाहीये पण त्याकाळात बड्याबड्या गायक गायिकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना याविषयी गॉसिप करताना पाहिलं आहे. कित्येकांनी तर मला तोंडावर येऊन विचारलं आहे की मी अमुक अमुक मुलीशी लग्न केले आहे का?''

पुढे ते म्हणाले की, ''ही वृत्ती फार वाईट आहे. रस्त्यावर अपघात होऊन पडलेल्या व्यक्तीच्या हातून महागडं घड्याळ चोरायचीच ही वृत्ती आहे. अशा अडचणीत सापडलेल्या माणसाला जर तुम्ही मदत करत नसाल तर किमान त्याला त्याचा लढा लढू द्यावा'' असं ते म्हणाले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर संदीप खरे यांनीही एक पोस्ट शेअर केली होती. ते म्हणाले होते की, ''तुम्ही त्याला कृपया त्रास देऊ नका, तो त्यांच्या मुलांचं प्रेमाने करतोय, अन् त्याने जर लग्न केलं तर तो तुम्हाला कळवेल.''