मुंबई : आजकाल मनातील भावना मोकळ्या करण्यासाठी, जगभरात घडणार्या कोणत्याही गोष्टीवर टीप्पणी किंवा आपलं मत मांडण्यासाठी सोशल मिडीया हे एक प्रभावी माध्यम आहे.
ट्विटर ही मायक्रो ब्लॉगिंग साईटदेखील जगभरातील लोकांना एकत्र जोडण्यासाठी मदत करते. मात्र कालपासून जगभरातील महिला ट्विटर सोडण्याचा संकल्प करत आहे.
शुक्रवार रात्रीपासून #WomenBoycottTwitter हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अमेरिकेतून सुरू झालेला ट्रेंड आता भारतातही पोहचला आहे.
का होतोय #WomenBoycottTwitter ट्रेंड ?
अमेरिकन अभिनेत्री रोज मैकगॉवन हीने निर्माते आणि दिग्दर्शक हार्वी वाइंसटाइन यांच्यावर बलत्काराचे आरोप केले आहेत. तिच्या मते 1997 साली तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यासंबंधित मैकगॉवनने एकाहूनअधिक ट्विट केले होते. ट्विटरने तिच्या या कृत्यावर आक्षेप घेत मैकगॉवनचे ट्विटर अकाऊंट सुमारे १२ तासांसाठी बॅन केले होते.
#StandWithWomen हा हॅशटॅग वापरून मैकगॉवननेही जगभरातील महिलांना ट्विटरच्या या कृत्याविरोधात उभं राहण्याचं आवाहन केले होते. मैकगॉवनच्या आवाहनाला अमेरिकेसह भारतातून प्रतिसाद मिळाला आहे. एका दिवसासाठी सार्यांनीच ट्विटरपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.