VIDEO : 'रात्रीस खेळ चाले २'साठी अशी झाली 'शेवंता'ची निवड...

'शेवंता'च्या रुपात अपूर्वा जेव्हा छोट्या पडद्यावर झळकली तेव्हा...

Updated: Apr 4, 2019, 09:19 AM IST
VIDEO : 'रात्रीस खेळ चाले २'साठी अशी झाली 'शेवंता'ची निवड...  title=

मुंबई : मालिका म्हटलं की त्यांचे कथानक आणि प्रत्येक टप्प्यावर मिळणारी अपेक्षित वळणं... अशाच काहीशा प्रतिक्रिया हल्ली पाहायला मिळतात. दैनंदिन मालिकांपासून तरुणाई काही हात दूरच राहणं पसंत करते. पण, त्यातही एका मालिकेला तरुणाईसह सानथोरांचं अमाप प्रेम मिळत आहे. ती मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले २. कोकणचा सुंदर निसर्ग, एक कुटुंब आणि त्याभोवती फिरणारं भयावह गोष्टींचा आधार घेत साकारण्यात आलेलं कथानक या गोष्टींच्या बळावर ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेला मिळणाऱ्या यशात त्यात सहभागी प्रत्येक कलाकाराची मोलाचा वाटा आहे. मग ते 'अण्णा नाईक' असो, 'दत्ता', 'पांडू', 'छाया' असो किंवा 'शेवंता' असो. 

'शेवंता....' हे पात्र मालिका सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि पाहता पाहता प्रतेकाच्याच मनाचा ठाव या 'शेवंता'ने घेतला. अण्णांच्या नजरेत आणि काळजात घर केलेली ही 'शेवंता' प्रेक्षकांच्याही काळजाचा ठोका चुकवते. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली ही भूमिका साकारली आहे, अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने. 'शेवंता'च्या रुपात अपूर्वा जेव्हा छोट्या पडद्यावर झळकली तेव्हा तिच्या डोळ्यांतील भाव आणि एकंदरच शेवंताचा लूक पाहता अण्णाच काय, असंख्य प्रेक्षक अक्षरश: घायाळ झाले. 

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'आभास हा' या मालिकेतून अपूर्वा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिच्या वाट्या आलेली ती भूमिका आणि आताची भूमिका यांमध्ये फेसबुकचं मुख्य योगदान आहे असंच तिला वाटतं. सोशल मीडियावर भावानेच टीपलेला एक फोटो पोस्ट केल्यानंतर त्याच फोटोमुळे अपूर्वाच्या वाट्याला या मालिकांमध्ये काम करण्याची संधी आली. त्यामुळे हा 'फेसबुक फॅक्टर' तिच्यासाठी खऱ्या अर्थाने फायद्याचा ठरला. खुद्द अपूर्वानेच 'झी २४ तास'शी संवाद साधताना याविषयीची माहिती दिली. यावेळी 'अण्णा नाईक' ही दमदार व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर हेसुद्धा उपस्थित होते. 

'अण्णा' आणि 'शेवंता'ची केमिस्ट्री ही न्यूजरुममध्येही पाहायला मिळाली. जेथे त्यांनी या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीरेखा साकरण्याविषयी आपलं मत मांडलं. झिरो फिगर, किंवा कमनीय बांधा या गोष्टींना हल्लीच्या अभिनेत्रींकडून प्राधान्य दिलं जातं. पण, शेवंता साकारण्यासाठी अपूर्वाला मात्र वजन वाढवण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे तिने हे आव्हान स्वीकारलं. पण, प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही, असा प्रश्नही तिच्या मनात घर करुन होता. अखेर सोशल मीडियावरील प्रतिक्रिया, मीम्स या सर्व गोष्टींनी शेवंताला मिळालेली पसंती पाहून तिला आपण साकारत असलेल्या कामाची पोचपावतीच मिळाली. 

'शेवंता'सोबत आलेल्या अण्णांनी म्हणजेच माधव अभ्यंकर यांनीही आपल्या भूमिकेचे काही पैलू उलगडले. प्रेक्षकांकडून मिळणारी दाद आणि एकंदर मालिकेच्या सेटवर चालणारी धमाल मस्ती याविषयी या दोन्ही कलाकारांनी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. शिवाय येत्या काळात मालिकेत रंजक वळण येण्याचेही संकेत दिले. त्यामुळे 'रात्रीस खेळ चाले २' आता कोणत्या वळणावर येणार याची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.