बॉलिवू़ड अभिनेत्री रकुल प्रित सिंगने सासरे आणि निर्माते वाशू भगनानी यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. आयफा पुरस्कार सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवर रकुलला हा प्रश्न विचारण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून वाशू भगनानी यांच्यावर आपले पैसे थकवल्याचे आरोप होत आहेत. न्यूज 18 ने शेअर केलेल्या व्हिडीओत रकुल प्रित सिंगने (Rakul Preet Singh) IIFA च्या ग्रीन कार्पेटवर टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल बोलताना दिसत आहे.
व्हिडीओत रकुल प्रीतला 'दे दे प्यार दे 2' च्या चित्रपटाच्या शुटिंगबद्दल विचारण्यात आलं. यावर तिने हसून उत्तर देत 'खूप छान' असं उत्तर दिलं. यानंतर रिपोर्टरने तिला विचारलं की, "मीडियामध्ये वाशू सरांबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. अनेक लोक म्हणतात की....". या क्षणी रकुल प्रीत रिपोर्टरला थांबवते आणि 'सॉरी' म्हणत निघून गेली.
वाशू भगनानी आणि त्यांचं प्रोडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंटवर त्यांच्या अनेक चित्रपटांतील क्रू मेंबर्सचे पैसे थकवल्याचा आरोप आहे. काही महिन्यांपूर्वी, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) अध्यक्ष बीएन तिवारी म्हणाले की, वाशू भगनानी यांच्यावर मिशन रानीगंज, गणपत आणि बडे मियाँ छोटे मियाँ या तीन चित्रपटांवर काम करणाऱ्या क्रू मेंबर्सचे 65 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे.
काही दिवसांपूर्वी बीएन तिवारी यांनी वाशू भगनानीविरोधातील तक्रारींबाबत खुलासा केला होता. "आम्हाला प्रथम टिनू देसाई यांच्याकडून तक्रार आली. मिशन राणीगंजसाठी त्यांच्याकडे सुमारे 33 लाखांची थकबाकी होती. नंतर वाशू भगनानी यांनी काही वेळ मागितला आणि एक महिन्याच्या आत पेमेंट केले जाईल असं सांगितलं. आमच्या कामगार संघटनेची थकबाकी एका महिन्यात देण्यात आली होती. परंतु टिनू देसाईचे पेमेंट अद्याप प्रलंबित आहे,” असं त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.
अक्षय कुमार-टायगर श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचं दिग्दर्शन केल्याचं मानधन अद्याप दिलं नसल्याचा आरोप अली अब्बास जफरने केला आहे. "पेमेंट्सला विलंब होत आहे, आणि योग्य प्रतिसाद दिला जात नाही आहे. या काळात, आम्ही वाट पाहत होतो आणि नंतर आम्हाला अली जफरकडून 7.5 कोटी रुपयांची तक्रार आली," असं ते पुढे म्हणाले. FWICE अध्यक्षांनी असा दावाही केला की, दिग्दर्शक विकास बहल सारख्या इतर दिग्दर्शकांचे पैसे देणेही बाकी आहे. गणपतसाठी 2.5 कोटी रुपये दिले गेले नाहीत.
वाशू भगनानी यांनी कुली नंबर 1, हिरो नंबर 1, प्यार किया तो डरना क्या, बडे मियाँ छोटे मियाँ, बीवी नंबर 1, तेरा जादू चल गया, मुझे कुछ कहना है, रहना है तेरे दिल में, दीवानापन, जीना सिर्फ मेरे लिए, सरबजीत, वेलकम टू न्यूयॉर्क आणि ओम जय जगदीश यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.