राखी सावंतने तनुश्री दत्तावर केले गंभीर आरोप, म्हणाली....

तू फक्त सेटवर ये, आपण एका गाण्यावर नृत्य बसवतोय

Updated: Sep 29, 2018, 11:26 PM IST
राखी सावंतने तनुश्री दत्तावर केले गंभीर आरोप, म्हणाली.... title=

मुंबई: तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादात आता राखी सावंतने उडी घेतली आहे. तनुश्रीने २००८ साली 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील गाण्यादरम्यान नाना पाटेकर यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. मात्र, राखी सावंतने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तनुश्रीने त्यावेळीही याविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे या चित्रपटातून तिची गच्छंती झाली होती. गाण्यात तिच्या जागी राखी सावंतची वर्णी लागली होती. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर राखी सावंतने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री दत्तावर गंभीर आरोप केले. यावेळी राखीने म्हटले की, त्या गाण्यात सुरुवातीला तनुश्री होती. मात्र, एक दिवस मला गणेश आचार्य यांचा फोन आला. त्यांनी मला लगेच सेटवर यायला सांगितले. त्यावेळी मी त्यांना कोणते गाणे आहे, अशी विचारणा केली. मात्र, त्यांनी मला फार काही न सांगता तू फक्त सेटवर ये, आपण एका गाण्यावर नृत्य बसवतोय, एवढेच सांगितले. मी त्यांना गाण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांबद्दलही विचारले. तेव्हा ते म्हणाले, तू फक्त ये, बाकी सर्व गोष्टींची व्यवस्था होईल. 

यानंतर काहीवेळात मला नाना पाटेकर यांनीही फोन केला. अखेर मी सेटवर गेले. त्यावेळी सेटजवळ एक मेकअप व्हॅन उभी होती. मात्र, त्या गाडीच्या काचा फुटल्या होत्या. मी घाबरून हा सर्व काय प्रकार आहे, असे गणेश आचार्य यांना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, तनुश्री या गाण्यात नाचणार होती. आम्ही गाण्याचा काही भाग शुटही केला होता. मात्र, गेल्या चार-पाच तासांपासून ती व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडायला तयार नाही.

तेव्हा गणेश आचार्य यांची अस्टिटंट डेझी शहा तिथेच उभी होती. तिनेदेखील तनुश्रीला बाहेर येण्यास सांगितले. मात्र, ती ऐकायला तयार नव्हती. त्यावेळी तिथे असलेल्या एका मेकअप आर्टिस्टने तनुश्रीने ड्रग्ज घेतल्याचे सांगितले. त्यामुळे तनुश्री बेशुद्ध पडली होती, असे राखीने म्हटले. 

खरंतर मला या गाण्यात काम करायचेच नव्हते. मात्र, त्यावेळी गणेश आचार्य आणि नाना पाटेकर यांच्या विनंतीला मान देऊन मी त्या गाण्यात नाचल्याचे राखीने सांगितले.