कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवताचे आगमन आता प्रत्येकाच्या घरात आणि सार्वजनिक मंडळात झाले आहे. मराठी सेलिब्रिटीजच्या घरीदेखील गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. मात्र, हिंदी आणि मराठीचा छोटा व मोठा पडदा गाजवणा-या राकेश बापटच्या घरी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीची बातच न्यारी आहे.
ही गणेशमूर्ती राकेशने स्वत: तयार केली असून, त्यासाठी त्याने नदीच्या गाळाचा आणि नैसर्गिक रंगाचा वापर केला आहे. आपल्या बाप्पाची प्रतिकृती बाजारातून विकत न घेता स्वतःच्या हाताने बनवून, त्याची अगदी भक्तिभावाने बापट कुटुंबात प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. लहानपणापसूनचं राकेश स्वत: गणरायाची मूर्ती स्वत: तयार करतो.
घरातच गणेशमूर्ती बनवणा-या या मराठीतील 'राजन'चा यंदाचा गणेशोत्सव अनेक कारणांनी खास ठरतोय. कारण बाप्पाच्या आशिर्वादाने राकेशचे तीन सिनेमे यंदा लागोपाठ प्रदर्शित होताये..तर दुसरीकडे हिंदीतील छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रिटी राकेशकडून गणपतीची मूर्ती बनवण्यास उत्सुक आहेत.
'पवित्र रिश्ता' फेम अभिनेता ऋत्विक धनजानीने तर यंदा राकेशच्या मार्गदर्शनाखालीच बाप्पाची मूर्ती तयार केली आहे..त्यामुळे या 'अवलिया' कलाकाराच्या 'इको फ्रेण्डली' बाप्पाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे..