मुंबई : दिग्दर्शक झोया अख्तरचा 'गली बॉय' सिनेमा ऑस्कर स्पर्धेतून बाद झाला. इंटरनॅशनल फिचर फिल्म या विभागात 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीत होता. यासाठी इतर ९१ देशांच्या प्रवेशिकाही आल्या होत्या. पण, रणवीरच्या चित्रपटाला इथे तग धरता आला नाही. 'गली बॉय'ला यश आलं नसलं तरीही या निमित्ताने आपण ऑस्करसाठी चित्रपट साकारावा की चांगला चित्रपट साकारावा हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याच धर्तीवर ऑस्करसाठीच्या निवडीची प्रक्रिया नक्की काय असते आणि त्यासाठी नेमकं काय करावं लागतं याकडेही लक्ष वेधलं जात आहे.
रणवीर सिंगचा हटके लुक, सेंस्युएश आलिया भट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोलेले रॅपर.. असं भन्नाट कॉम्बिनेशन असतानाही भारताचा 'गली ब़ॉय' ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत टिकू शकला नाही. पक्का मुंबईकर पण ग्लोबल गोष्ट सांगणारा 'गली बॉय' बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाला होता. तेव्हाच त्याची ऑस्करवारी नक्की झाली होती. सोमवारी ऑस्करसाठी इंटरनॅशनल फिचर्स फिल्म कॅटेगरीची शॉर्ट लिस्ट जाहिर झाली. त्यात मात्र 'गली बॉय' नव्हता. या यादीत १० चित्रपटांचा समावेश आहे. रशिया, पोलंड, चेक रिपब्लिक, साऊथ कोरियापासून हंगेरी आणि फ्रान्स या नेहमीच स्पर्धेत असणाऱ्या देशातील चित्रपटांची यात वर्णी लागली आहे.
ऑस्करची निवडप्रक्रिया कशी असते तरी कशी?
'द अकॅडमी'चे जगभरात जवळपास ६३०० सदस्य आहेत. त्यात भारताचे ५०च्या आसपास सदस्य आहेत. यामध्ये अर्ध्याहून जास्त सदस्यांची मतं मिळाली म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमाचा ऑस्कर पुरस्कार मिळतो. ही मतं मिळवण्याची प्रक्रियाही तितकीच रंजक असते. इथल्या प्रत्येक सदस्यापर्यंत आपला चित्रपट पोहोचवावा लागतो. त्यासाठी एक एजंट नेमावा लागतो. त्यानंतर चित्रपटाबरोबरच जागतिक मुल्य असावी लागतात. हा सर्व फिल्म मॅनेजमेन्ट किंवा चित्रपट व्यवस्थापनाचा भाग आहे.
पाहा : 'छपाक'च्या निमित्ताने दीपिका- विक्रांतची हवीहवीशी 'नोक- झोक'
मुळात यातच आपण कमी पडतो. याआधी भारतातून मिरा नायरचा 'सलाम बॉम्बे' (१९८९), आशुतोष गोवारीकरांचा 'लगान' (२००१) मेहबुब खानचा 'मदर इंडिया' (१९५७) या चित्रपटांना फॉरेन फिल्म कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं. पण बोस्निया या छोट्या देशातल्या 'नो मॅन्स लॅँड' या चित्रपटासमोर तो टिकाव धरु शकला नाही.
आताचं म्हणावं तर, सध्याच्या घडीला प्राथमिक पातळीवर निवड झालेल्या १० चित्रपटांना यापुढे नॉमिनेशनसाठी पाठवण्यात येईल. तेव्हा हे सर्व सदस्य ते पाहतील आणि नंतरच आपलं मत देतील. ही सर्व प्रक्रिया पाहता ऑस्कर मिळवला म्हणजेच चांगला सिनेमा ही मानसिकता बदलण्याची गरज आहे हे खरं. स्पर्धेत जास्त मतं ज्याच्याकडे तो सिनेमा अव्वल असं हे साधं सोप गणितच इथे सर्व काही ठरवून जातं.