प्रियांका चोप्राने 'भारत' सोडला

शुटींग सुरू होऊन ५ दिवसही पूर्ण झाले नसताना प्रियांकाने 'भारत' सोडल्याचे वृत्त येतंय. 

Updated: Jul 30, 2018, 09:42 AM IST
प्रियांका चोप्राने 'भारत' सोडला  title=

मुंबई : प्रियांका चोप्राने बॉलीवुड सिनेमात काम करून खूप मोठा काळ लोटलाय. त्यानंतर सलमान खानच्या 'भारत' सिनेमातून ती पुनरागम करणार असं म्हटलं जात होतं. यासाठी प्रियांकाला मोठ मानधनही देण्यात आलं. यामध्ये तिची भुमिकाही महत्त्वाची होती. या सिनेमाच्या शूटींगआधीच खूप साऱ्या चर्चा रंगल्या. नुकतीच शुटींग सुरू होऊन ५ दिवसही पूर्ण झाले नसताना प्रियांकाने 'भारत' सोडल्याचे वृत्त येतंय.

सलमानच्या 'भारत'साठी खूप तयारी करण्यात आली होती. ईदच्या निमित्ताने रिलीज होणारा हा सिनेमा चांगली कमाई करेल अशीही आशा व्यक्त करण्यात येत होती.

प्रियांकाचं मानधन 

प्रियांका चोप्रा आणि सलमान खूप मोठ्या काळानंतर एकत्र येत होते.  हॉलिवूडमध्ये रमलेल्या प्रियंकाने १४ कोटींची मागणी केली होती मात्र अखेर हे डील १२ कोटीचे झाले होते असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 'पद्मावत'साठी दीपिका पादुकोणने १२ कोटी मानधन घेतले आहे. १४ कोटी हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक मागण्यात आलेला मानधनाचा आकडा मानला जात होता.

हे आहे कारण 

 प्रियांका ही बॉयफ्रेंड निक जोनससोबत लग्न करणार असल्याने 'भारत' पासून दूर गेल्याचे सांगितले जात आहे. हे तिचे वैयक्तिक कारण असल्याने सलमान समजून घेईल अशी आशा करण्यात येतेयं. असं असलं तरीही प्रियांका चोप्रा 'भारत' सोडणार असल्याने तिच्या चाहत्यांना धक्का पोहोचलाय.

बहुप्रतिक्षित सिनेमा 

अली अब्बास जफर आणि सलमान खान ही जोडी 'टायगर जिंदा है', 'सुलतान' नंतर 'भारत' हा सिनेमा घेऊन येणार आहे. हा चित्रपट सलमान सोबतच अलीसाठी देखील खास सिनेमा आहे. त्यांच्या सोबतीला अली फजल हा अभिनेता 'भारत'मध्ये झळकणार आहे असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे.  अली फजलने अजूनही या चित्रपटाबाबत खुलासा केलेला नाही. इतर प्रोजेक्ट्सचे काम पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाबाबत तो निर्णय घेणार आहे.

कोरियन सिनेमाचा रिमेक 

'भारत' हा कोरियन सिनेमा 'ओड टू माई फादर'चा हिंदी रिमेक आहे. 'ओड टू माई फादर' यामध्ये 1950 ते 2014 या काळामधील घटना  एक सामान्य नागरिकाच्या नजरेतून व्यक्त करण्यात आल्या आहेत. भारत सिनेमामध्येही स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि सद्यस्थिती या दरम्यानच्या घटना सलमान  खानच्या नजरेतून रूपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे.