Pravin Tarde : लोकप्रिय मराठमोळे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे हे त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखले जातात. तर प्रवीण तरडे हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. सगळ्यांच्या मनात राज्य करणारे प्रवीण तरडे हे त्यांच्या हटके भूमिकेमुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. त्यांचा आणीबाणी हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. दरम्यान, त्यांना ओळख मिळवून देणारा चित्रपट म्हणजे 'देऊळ बंद'. या चित्रपटाविषयी आणि स्वामी समर्थांविषयी त्यांनी अनेक गोष्टी नुकत्याच दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलं की या चित्रपटाआधी त्यांना स्वामी समर्थ कोण आहेत हे माहित नव्हतं. त्यांचा देवावर विश्वास नव्हता. त्यानंतर हा चित्रपट कसा झाला याविषयी याचा किस्सा त्यांनी सांगितला आहे.
प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत याविषयी सांगितलं होतं. याविषयी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की 'माझी आई आणि वडील वारकरी होते, त्यामुळे घरात विठ्ठलाची भक्ती व्हायची. दररोज पूजा मी पण करायचो पण ते तेवढ्यापुरतीच. माझी अशी काही देवावर श्रद्धा नव्हती. तेव्हा स्वामींवर डॉक्युमेंट्री बनवायची संधी माझ्याकडे आली. तेव्हा मुरलीधर मोहोळ यांनी मला कैलास वाणी यांना जाऊन भेटा असं सांगितलं. मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या भिंतीवर भलामोठा स्वामींचा फोटो होता. मला आधी वाटायचं की स्वामी म्हणजेच रामदास स्वामी असतील. पण जेव्हा त्यांच्या घरी होतो तेव्हा कैलास वाणी म्हणाले तुम्ही स्वामींना ओळखतच असाल. मी लगेच त्या फोटोकडे पाहून हात जोडले आणि म्हणालो हे काय. त्यांनी मला पाच लाख रुपये बजेट असल्याचं सांगितलं. तितक्यात काही होणार नाही हे मला माहित होतं, पण तरी सुद्धा मी त्यांच्यासोबत नाशिकला गेलो. दुसऱ्या दिवशीच आम्हाला तिथे जायचं होतं त्यामुळे तिथे जाताना प्रवासात काहीतरी कथानक सुचेल हा विचार करून मी झोपलो.'
याविषयी पुढे सांगत प्रवीण म्हणाले की प्रवास करताना मला त्रास होतो, मला उलट्या होतात. त्यामुळे गाडीतही मी झोपलो. त्यानंतर नाशिकला जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा मठात जाण्यासाठी तिथे एक रांग असते, त्यामुळे त्या रांगेत उभे असताना सुचेल असा विचार करून मी मठात गेलो. पण जेव्हा आम्ही मठाकडे जाण्यासाठी निघालो तेव्हा मी पाहिलं की आमच्यासाठी रांग थांबवण्यात आली आहेत. आम्ही दर्शन घेतलं... दर्शन घेतल्यानंतर एक माउली आले आणि ते मला म्हणाले, हा ऐकवा कथा.' कोणाला विश्वास बसणार नाही पण तिथे त्यांच्या समोर बसेपर्यंत माझ्या डोक्यात कुठलीही कथा नव्हती. मग मी माझीच गोष्ट त्यांना सांगायला लागलो. एक शास्त्रज्ञ असतो, तो असतो नास्तिक, त्यांना तुमचे स्वामी काय आवडत नसतात. त्यांना तुमचे म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी आपले स्वामी असं म्हणालो. जे सुचलं ते बोलत गेलो. मी थांबलो तेव्हा माउलींनी मला एक प्रश्न केला की, ‘तुम्ही खरंच देव मानता?’
हेही वाचा : 56 कोटींच्या कर्जात बुडालेल्या सनी देओलची एकूण संपत्ती किती माहितीये का?
त्यानंतर याविषयी आणखी सांगत प्रवीण तरडे पुढे म्हणाले, 'मी मानतो असं नाही पण माझे आई हे वडील वारकरी आहेत. वारीला जातात, घरात सकाळ संध्याकाळ पूजा असते. त्यावर ते पुन्हा प्रश्न करत म्हणाले, तुम्ही मानता? त्यांनी आता पकडलं असं समजून मी म्हणालो, नाही मी नाही मानत एवढं देवाला. तेव्हा त्यांनी लगेच प्रश्न केला की, खरं सांगा ही गोष्ट आता सुचली की आधी? आता माउलींना मनातलं सगळं कळत असेल या विचाराने मी म्हणालो, हो मला गाडीत उलटीचा त्रास होतो. मग विचार करायला वेळ नाही मिळाला. इथे आल्यावर मला सुचली. ते हसले आणि उठून म्हणाले, वाटेल ते बजेट द्या, डॉक्युमेंट्री नाही मला यावर चित्रपट करायचा आहे. मग स्टोरी बनत गेली तसा तो चित्रपट बनत गेला आणि हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला. त्या एका घटनेमुळे मला श्रद्धा म्हणजे काय ते शिकवलं. विश्वास असेल तर सगळं शक्य होतं. तेच आपल्या हातून सगळं करवून घेतात हे पटलं आणि तेव्हापासून मीही स्वामींना मानू लागलो.'