Prasad Khandekar's Letter to Namrata Sambherao : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री नम्रता संभेराव ही सध्या तिच्या 'नाच गं घुमा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काल हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील तिची भूमिका ही प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर नम्रताचा चांगला मित्र आणि अभिनेता प्रसाद खांडेकरनं तिला शुभेच्छा देत एक खास पत्र लिहिलं आहे. त्याशिवाय त्यासोबत त्यानं तिला एक भेट वस्तू देखील दिली आहे. त्याचा फोटो नम्रतानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नम्रतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नम्रतानं प्रसादनं दिलेल्या पत्राचा फोटो त्यासोबत त्यानं दिलेल्या भेट वस्तूचा आणि त्याच्यासोबतचा असा फोटो शेअर केला आहे. प्रसादनं नम्रताला नमा नावाचे कानातले भेट केले आहेत. तर त्यासोबत त्यानं पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात प्रसादनं लिहिलं आहे की 'महाराष्ट्राची लाडकी आणि टॅलेंटेड अभिनेत्री नमा! 1 मे ला तुझ्या आयुष्यातील पहिला सुपरहिट सिनेमा, ज्यात तू प्रमुख भूमिकेत आहेस 'नाच गं घुमा' प्रदर्शित होतोय. खूप वर्षे या क्षणाची वाट पाहिलीस आणि आज तो क्षण आला. आताचा हा संपूर्ण काळ जगून घे…यातील प्रत्येक क्षणाचा उपभोग घे. यापुढे अजून खूप सारे सुपरहिट सिनेमे तुझ्या नावावर लागतील पण, पहिला चित्रपट हा नेहमी स्पेशल असतो. त्यामुळे 1 मे पासून प्रत्येक क्षण साठवून ठेव आणि अवार्ड्ससाठी घरात जागा पण करून ठेव…खूप खूप शुभेच्छा तू सुपरस्टार आहेस'.
पुढे तळटीप लिहतं प्रसाद म्हणाला, 'मोबाईल फॉर्मेट झाला तर पाठवलेले मेसेज अनेकदा डिलीट होतात पण, कागद तसाच राहतो. पाण्याच्या संपर्कात आला नाही किंवा थंड तापमानात साधारपणे 30-40 % आद्रतेत कागद हा टिकू शकतात. अगदी शेकडो वर्षे म्हणून हे पत्र लिहिले आहे. तुझ्या पहिल्या सुपरहीट सिनेमासारखा हा कागदही दिर्घकाळ टिकेल, तु हरवला नाहीस तर'.
हेही वाचा : 'हा अत्यंत थर्ड क्लास क्रायटेरिया...', सोशल मीडिया स्टार कलाकार होण्यावर प्रसाद ओकची स्पष्ट भूमिका
दरम्यान, नम्रतानं हे पत्र शेअर करत कॅप्शन दिलं की "चित्रपट प्रदर्शित व्हायच्या एक दिवस आधी तू हे पत्र लिहिलंस... तू नेहमीच प्रोत्साहन देत आलायस. सिनेमा सगळीकडे हाऊसफूल चाललाय, इतकं सूंदर सरप्राइज माझा खरा मित्र. हे खूप मोलाचे आहे. काय भेट मिळाली आहे. स्पिचलेस... सुंदर आणि क्रिएटीव्ह गिफ्ट आणि पत्र लिहिलंस तू किती भारी रे पश्या."