मुंबई : 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असणारी अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींवर त्यांच्या आयुष्यातील घडामोडींवरही विशेष लक्ष ठेवून असते, असं म्हणायला हरकत नाही. अचानक कंगनाच्या या स्वभावाविषयी चर्चा होण्यामागचं कारणही तसंच आहे.
आगामी चित्रपटाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या या 'क्वीन' कंगनाने तिच्या खासगी अंगरक्षकाचा वाढदिवस साजरा केला आहे. कंगनाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये कंगनाच्याच ऑफिसमध्ये तिचा अंगरक्षक, कुमार केक कापताना दिसत असून, तिची टीमही तेथे उपस्थित दिसत आहे. मुख्य म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या कुमार नावाच्या या अंगरक्षकाला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खुद्द कंगनाही तेथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे.
आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत कंगनाने अंगरक्षकाचा खास दिवस खऱ्या अर्थाने आणखी खास केला असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर तिच्या याच स्वभावाची सध्या वाहवा केली जात आहे.
बी- टाऊनची ही अभिनेत्री येत्या काळात 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटातून एका रणरागिणीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारण्याचं शिवधनुष्य कंगनाने उचललं असून, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच ती यात यशस्वी झाली आहे का, हे स्पष्ट होणार आहे.