मुंबई : देशाच्या उत्तेरकडे असणारे किंबहुना भारताचा मुकुट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू- काश्मीर या राज्याविषयी एक महत्त्वाचा निर्णय सोमवारी राज्यसभेत घेण्यात आला. या राज्यात लागू करण्यात आलेला अनुच्छेद ३७० रद्द करण्याप्रकरणीचा निर्यय सादर केला गेला. ज्याअंतर्गत जम्मू- काश्मीरची दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी केली जाईल.
लडाख आणि जम्मू- काश्मीर अशा दोन भागांमध्ये विभागल्या गेलेल्या या राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असा हा प्रस्ताव मांडला जाताच सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. जगभरातून अनेकांनीच या विषयी मतप्रदर्शन केलं. ज्यामघध्ये पाकिस्तानही मागे नव्हतं.
आपण काश्मिरी जनतेच्या बाजूने उभं असल्याचं म्हणत पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्री माहिरा खान हिने एक ट्विट केलं. 'ज्या गोष्टीला आपण पाहू इच्छित नाही तिला आपण कायमस्वरुपी मिटवतो का? ही फक्त वाळूत एखादी रेख ओढण्याची बाब नाही. ही सर्वसामान्यांच्या आयुष्यभराची बाब आहे, निष्पाप बळी जाणाऱ्यांची बाब आहे. स्वर्ग धुमसतोय... आपण फक्त रडतोय', असं ट्विट करत तिने आपली भूमिका स्पष्ट केली.
काश्मिरी जनतेच्या बाजूने ट्विट करणाऱ्या माहिराने तिची बाजू ठामपणे मांडली खरी, पण तिच्यावर लगेचच टीकेची झोड उठवण्यात आली. भारतात हिती लोकप्रियता पाहता याच देशातून तिला अर्थार्जनाच्या संधी आहेत, असं म्हणत तिच्यावर कोणी तोफ डागली. तर, कुटनितीपूर्ण ट्विट पाहा असं म्हणतही तिच्यावर निशाणा साधला गेला. काश्मीर यांच्या हातून निसटलं म्हणूनच ती अशी म्हणत आहे असंही नेटकरी माहिराला म्हणाले. सोशल मीडियावर अतिशय़ महत्त्वाच्यामुद्द्यावर मतप्रदर्शन करणं माहिराला अडचणीत आणणारं ठरलं. तेव्हा आता या साऱ्याला ती काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.