वेब सीरिज चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या स्क्विड गेमचा दुसरा सीझन (Squid Game Season 2) अखेर प्रदर्शित झाला आहे. मात्र हा सीझन पाहताना कोरियामधील नेटफ्लिक्स युजर्सना नवीन वर्षाची भेट मिळाली आहे. नेटफ्लिक्स कोरियाने चुकून स्क्विड गेम सीझन 3 (Squid Game Season 3) ची तारीख जाहीर केली आहे. नेटफ्लिक्सने आपल्या युट्यूब चॅनेलवर सीझन 3 चा व्हिडीओ शेअर करताना त्यात प्रिमिअर तारीखही जाहीर करुन टाकली.
या क्लिपमध्ये ग्रीन लाइट, रेड लाईट गेममधील प्रसिद्ध रोबोट यंग ही दिसत आहे. तिला एका नवीन सेटिंगमध्ये हलवले जात आहे जिथे तिची चुल-सू या दुसऱ्या रोबोटशी गाठ पडते.
सीझन 2 मधील पोस्ट-क्रेडिट सीन सारख्यात असणाऱ्या या व्हिडीओत आगामी सीझनमध्ये एका नवीन गेमबद्दल अंदाज लावला आहे. "स्क्विड गेम सीझन 3, 2025 रिलीज" असं शीर्षक देण्यात आलं आहे. अतिरिक्त माहिती देताना खाली नमूद करण्यात आलं आहे की "27 जून रोजी नेटफ्लिक्सवर स्क्विड गेम पहा".
Netflix accidentally reveals that the final season of ‘SQUID GAME’ releases on June 27. pic.twitter.com/3gswYQpoqf
— The Hollywood Handle (@HollywoodHandle) January 1, 2025
दरम्यान नेटफ्लिक्स कोरियाकडून झालेल्या या चुकीमुळे चाहत्यांमध्ये मात्र प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. नेटफ्लिक्स कोरियाकडून खरंच चुकून झालं आहे की, मुद्दामून करण्यात आलं आहे अशीही चर्चा रंगली आहे.
एका एक्स युजरने लिहिलं आहे की, "ही टिप्पणी असा दावा करत आहे की स्क्विड गेम सीझन 3 27 जून रोजी रिलीज होईल... Netflix कोरियाने चुकून जाहीर केल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. पण नंतर तो व्हिडीओ डिलीट केला.". तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, "Netflix ने चुकून 'SQUID GAME' चा अंतिम सीझन 27 जून रोजी रिलीज होत असल्याचं जाहीर केलं आहे”.
अनेकजण आगामी रिलीजला स्क्विड गेम सीझन 3 म्हणून संबोधत असले तरी निर्माते ह्वांग डोंग-ह्युक यांनी तो पूर्णपणे नवीन सीझन नसून सीझन 2 चा पुढील भाग असल्याचं म्हटलं आहे. ह्वांगने सुरुवातीला स्क्विड गेमची एकच मालिका म्हणून कल्पना केली. तथापि, कथा जसजशी विकसित होत गेली, आणि जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळत गेली तसतशी ती एका सीझनमध्ये बसण्याइतकी मोठी झाली. गी-हुन गेममध्ये परतल्यानंतर आणि बंडखोरीची ठिणगी, त्याच्या ध्येयानंतरची कथा, नैसर्गिकरित्या दोन भागात विभागली गेली.