मोठ्या धक्क्यातून सावरणारे नसिरुद्दीन शाह 'गदर 2', The Kashmir Files बद्दल हे काय बोलून गेले?

Naseeruddin Shah : बॉलिवूड चित्रपटांना मिळणारी लोकप्रियता पाहता त्यांच्या यशानं नसिरुद्दीन शाह यांनाही थकित केलं. या चित्रपटांना मिळणाऱ्या यशाबद्दल शाह नेमकं काय म्हणाले? पाहा... 

सायली पाटील | Updated: Sep 11, 2023, 10:42 AM IST
मोठ्या धक्क्यातून सावरणारे नसिरुद्दीन शाह 'गदर 2', The Kashmir Files बद्दल हे काय बोलून गेले?  title=
Naseeruddin Shah on success of The Kashmir Files Kerala Story Gadar 2 know the reason

Naseeruddin Shah : बॉलिवूडमध्ये चित्रपटांची धाटणी, कथानक, कलाकारांचा अभिनय किंवा एकंदरच सबंध बॉलिवूड कितीही बदललं तरीही काही गोष्टी, काही कलाकार मात्र आजही त्यांच्या भूमिकांनी सर्वांचं लक्ष वेधतात. यापैकी एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचं. बऱ्याच काळानंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करणाऱ्या शाह यांनी हल्लीच एका मुलाखतीत  Kashmir Files आणि तत्सम चित्रपटांना मिळणाऱ्या लोकप्रियतेबाबत चिंतेचा सूरही आळवला. 

बॉलिवूड बदलतंय....

एखाद्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवत चित्रपट साकारल्या जाण्याच्या शैलीतच बदल झाल्याची बाब त्यांनी एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत स्वीकारली. 'हो अगदी..., हल्ली तुम्ही शब्दावाटे जितके व्यक्त होताय तितकेच प्रसिद्धही होताय. कारण, सध्या देशात हेच सुरुये. हल्ली देशावर प्रेम करणं पुरेसं नसून तशी दवंडी पिटणं, काल्पनिक शत्रू निर्माण करणंही गरजेचं आहे', असा उपरोधिक सूरही त्यांनी आळवला. यावेळी ही मंडळी जे काही करत आहेत ते नेमकं किती हानिकारक आहे याचा अंदाजच त्यांना नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

'मी केरला स्टोरी, गदर 2 हे चित्रपट पाहिले नाहीत. पण, त्यांचं कथानक मला माहितीये. किंबहुना सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांसारख्यांनी साकारलेल्या चित्रपटांना डावलून द काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटांना मिळणारी लोकप्रियता मन विषण्ण करणारी आहे', असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली. 100 वर्षांनंतर जेव्हा प्रेक्षक 'भीड' आणि 'गदर 2' पाहतील तर, कोणत्या कलाकृतीतून वास्तव समोर आलं हे त्यांच्या लर्षात येईल असंही शाह म्हणाले. 

या ट्रेण्डबद्दल बोलताना 'हे किती मागसलेपणाचं लक्षण आहे' असं म्हणणंही फार सौम्य ठरेल. चित्रपट निर्माते चुकीच्या गोष्टींचं कौतुक करणारे चित्रपट बनत असून ही भार भीतीदायक परिस्थिती आहे. तसेच काहीही कारण नसताना एखाद्या ठराविक समाजाविरोधात चित्रपट बनवण्याचा हा ट्रेण्ड भविष्याच्या दृष्टीने फारच धोकादायक आहे.

दिग्दर्शनात इतकी मोठी विश्रांती का? 

तब्बल 17 वर्षांनंतर Man Woman Man Woman च्या निमित्तानं दिग्दर्शन क्षेत्रात नशिब आजमावणाऱ्या शाह यांनी इतकी मोठी विश्रांती का घेतली यामागची कारणं सांगताना आपण एका धक्क्यातून सावरत असल्याचंही म्हटलं. 

'एक वाईट चित्रपट साकारण्याच्या धक्क्यातून मी सावरत होतो. तो चित्रपट मी विचार केला होता तसा साकारलाच गेला नाही. त्यावेळी मला फारसं तांत्रिक पाठबळही नव्हतं. अर्थात ती एक चांगली स्क्रीप्ट होती. पण, चित्रपटाच्या संकलनावेळी त्यातील खाचखळगे माझ्या लक्षात आले', असं म्हणताना त्यांनी कलाकारांचा अभिनय वगळता सर्वस्वी अपयश आपलंच होतं असंही ते म्हणाले. आणखी एक चित्रपट साकारू असं वाटलंही नव्हतं असंही ते म्हणाले. चित्रपट साकारणं म्हणजे कमालीची मेहनत, अनेकांचे स्वाभिमान, वेळापत्रकं आणि हिशोबांमध्ये येणाऱ्या अडचणी येतात असंही त्यांनी लक्षात आणून दिलं. शाह यांचा चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि एकंदरच त्यांची मतं तुम्हाला पटली का?