मुंबई : मराठी सिनेसृष्टीत एका पेक्षा एक जबरदस्त चित्रपट देणारा लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे आता एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टेलिव्हिजनवरील 'कोण होणार करोडपती'या शोसाठी नागराज मंजुळे सुत्रसंचालन करणार आहे. एवढंच नाही तर नागराज मंजुळे आता गायक म्हणूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'कोण होणार करोडपती' या शोसाठी गाण गायलं आहे. 'कोण होणार करोडपती'चं टायटल साँग नागराजने गायलं आहे.
हिंदीमधील 'कौन बनेगा करोडपती'च्या यशानंतर आता मराठीत 'कोण होणार करोडपती' सुरु करण्यात येत आहे. या शोसाठी सुत्रसंचालनासह शोचं गाणंही खुद्द नागराज मंजुळेने गायलं आहे. 'कोण होणार करोडपती'चं टायटल ट्रॅक गात मी वेगळा प्रयत्न केला असल्याचं नागराज मंजुळेने म्हटलं आहे. प्रेक्षकांमध्ये 'कोण होणार करोडपती'साठी मोठी उत्सुकता आहे. नागराजच्या या साँगलाही मोठी पसंती मिळत आहे. दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि आता सुत्रसंचालक म्हणून त्यांच्या खास भाषेत शैलीतून होणाऱ्या सुत्रसंचलनाबाबत प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.
तसंच हिंदीतील 'कौन बनेगा करोडपती' येत्या ऑगस्ट महिन्यापासून टेलिव्हिजनवर सुरु करण्यात येणार आहे. 'केबीसी'चं रजिस्ट्रेशन १ मे पासून सुरु होणार आहे. रात्री ९ ते १० चालणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती'चं सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करणार आहेत. त्यामुळे आता मराठीत नागराग मंजुळे आणि हिंदीत अमिताभ बच्चन या दोघांमुळे शोची उत्सुकता वाढली आहे.