तेलुगू सुपरस्टार नागार्जूनच्या (Nagarjuna) अंगरक्षकाने दिव्यांग चाहत्याला (specially abled fan) धक्का देऊन बाजूला केल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मुंबई विमानतळावर घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला होता. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना खडेबोल सुनावले होते. सोशल मीडियावर झालेल्या या टीकेची नागार्जुननेही दखल घेतल्याचं दिसत आहे. याचं कारण नागार्जुनने त्या चाहत्याची अखेर भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी त्याची गळाभेट घेतली आणि तुझी काही चूक नव्हती असं सांगितलं. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याआधी नागार्जुनने आपल्या अंगरक्षकाने धक्का दिल्याबद्दल चाहत्याची सोशल मीडियावरुन माफी मागितली होती.
नागार्जुन 'कुबेरा' चित्रपटाच्या शुटिंगसाठी सध्या मुंबईत आहे. 26 जून नागार्जून आपल्या कारने मुंबई विमानतळावर दाखल झाला. यावेळी कारमधून उतरताच त्याने आपल्या चाहत्याची भेट घेतली. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार नागार्जूनने चाहत्याची गळाभेट घेतली. यावेळी चाहत्याने हात जोडून नागार्जुनकडे माफी मागितली. त्यावर नागार्जुनने तुझी काही चूक नव्हती असं सांगितलं. नागार्जुनने त्याच्यासोबत फोटोही काढले.
हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने म्हटलं आहे की, 'हीच सोशल मीडियाची ताकद आहे'. दरम्यान दुसऱ्या एकाने नागार्जुनचं कौतुक केलं आहे. नागार्जुन अत्यंत विनम्र आणि जमिनीशी जोडलेला व्यक्ती आहे असं त्याने म्हटलं आहे.
मात्र काहींनी हा पीआर स्टंट असल्याचं म्हटलं आहे. "फक्त व्हिडीओ व्हायरल झाला म्हणून तो हे सगळं करत आहे. हा फक्त शोऑफ आहे. त्याला त्यावेळी वाईट का वाटलं नाही. तो बिचारा दिव्यांग होता आणि तरीही त्याने त्याला माणुसकी दाखवली नाही किंवा दखल घेतली नाही," अशी कमेंट त्याने केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत कॅफेमधील दिव्यांग कर्मचारी नागार्जुनला भेटण्यासाठी पुढे गेला असता त्याचा अंगरक्षक त्याला धक्का देऊन बाजूला करतो. विशेष म्हणजे यावेळी नागार्जुनचं लक्षही नसतं. तो काहीच न झाल्याप्रमाणे पुढे चालत राहतो. दुसरीकडे त्याच्या मागे असणारा धनुष हे सगळं पाहून व्यक्त होताना दिसतो. 23 जूनला ही घटना घडली होती.