मिसेस फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर मुंबई पोलिसांनी पायलला ट्विटरवर केले अनब्लॉक

नागरिक त्यांचे वैयक्तिक मत व्यक्त करतात. 

Updated: Jul 12, 2019, 09:36 PM IST
मिसेस फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर मुंबई पोलिसांनी पायलला ट्विटरवर केले अनब्लॉक title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीच्या वायफळ आणि वादग्रस्त वक्तव्यांना कंटाळून मुंबई पोलिसांनी तिला ट्विटरवर ब्लॉक केले होते. मात्र, अमृता फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यामुळे पोलिसांनी पायलला पुन्हा अनब्लॉक करावे लागले आहे. 

पायल रोहतगी सोशल मीडियावर अनेकदा आक्षेपार्ह वक्तव्ये करते. काही दिवसांपूर्वीच तिने मुंबई पोलिसांसंदर्भात केलेले एक ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तिला वैतागून ट्विटरवर ब्लॉक केले होते. 

यानंतर पायलने आक्रमक भूमिक घेत या कथित अन्यायाविरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. तिने स्वत:च्या ट्विटमध्ये या तिघांना टॅग केले होते. यानंतर अमृता फडणवीस यांनी पायल रोहतगीच्या या ट्विटची दखल घेतली. हे ट्विट रिट्विट करण्याबरोबरच अमृता यांनी मुंबई पोलिसांना उद्देशून आणखी एक ट्विट केले. 

नागरिक त्यांचे वैयक्तिक मत व्यक्त करतात. या सगळ्यात त्यांचा धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसतो. त्यामुळे सरकारी संस्थांनी त्यांना सोशल मीडियावर अशाप्रकारे ब्लॉक करणे योग्य नाही. तेव्हा कृपया मुंबई पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. 

यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ पायल रोहतगीला अनब्लॉक करत अमृता फडणवीस यांना स्पष्टीकरण दिले. मुंबई पोलीस नेहमीच प्रत्येक नागरिकाच्या पाठिशी उभे राहिले आहेत. पायल रोहतगीचे ट्विटर अकाऊंट सुरु असून आम्ही कोणत्याही नागरिकाशी संवाद तोडत नाही. याबाबत कोणताही तांत्रिक बिघाड असल्यास आमची टीम त्याचा शोध घेत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.