मुंबई : बुधवारी मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यात दोन इसमांवर दहशतवादी असल्याच्या संशयावरुन कारवाई केली. सीमा सुरक्षा दलातील निवृत्त अधिकारी आणि बँकेच्या सुरक्षारक्षक पदावर काम करणाऱ्या अनिल महाजन यांनी दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. आत्मघाती हल्लेखोरांप्रमाणे पेहराव असणारे दोघेजण सदर परिसरात वावरत होते. सिगारेट विकत घेतानाही त्यांना पाहण्यात आलं होतं.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून हाती आलेल्या माहितीनुसार ते दोघंही एका बसमध्ये चढले होते. पण, ती बस चित्रटाचं चित्रीकरण सुरु असणाऱ्या ठिकाणी जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांविषयी कळताच पुढे जवळपास तासाभराच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं. अटकेत असणाऱ्या या व्यक्तींची ओळख बलराम गिनवाला (२३) आणि अरबाज खान (२०) अशी सांगण्यात आली. पण, या प्रकरणाला खरं आणि रंजक वळण तर तेव्हा मिळालं ज्यावेळी ते दोघंही हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी चित्रपटातील 'एक्स्ट्रा' कलाकार असल्याची बाब समोर आली.
एका वृत्तवाहिनीच्या ट्विटर अकाऊंटवरुन या दोघांची छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली होती. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर निर्मात्यांना त्यांच्या सुटकेसाठी काही कागदपत्रांची व्यवस्था करावी लागली. त्या दोघांचीही सुटका झाली खरी. पण, तरीही भारतीय दंडसंविधानाच्या कलम १८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी तणावाचं वातावरण करण्यासाठी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.