२५० पॉपकॉर्न : राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले

मल्टिप्लेक्समध्येच पाच रुपयांची वस्तू १५० ते २५० रुपयांना विकली जाते. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारलाच फटकारले आहे.

Updated: Jun 27, 2018, 11:00 PM IST
२५० पॉपकॉर्न : राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले title=

मुंबई : सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्यांना मल्टिप्लेक्समध्ये बाहेरुन खाद्यपदार्थ आणण्यास मज्जाव केला जातो. मात्र, मल्टिप्लेक्समध्येच पाच रुपयांची वस्तू १५० ते २५० रुपयांना विकली जाते. याबाबत प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त होत होती. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारलाच फटकारले आहे.

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या दरावरुन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांवर राज्य सरकारचे नियंत्रण का नाही? ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का,असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारलाय. जर बाहेरचे खाद्यपदार्थ सुरक्षेच्या कारणाखाली ग्राहकांना आणता येत नसतील तर या पदार्थ्यांच्या दरांवर सरकारचे नियंत्रण नको का, असा उच्च न्यायालयाने विचारला.

दरम्यान, मल्टिप्लेक्सच्या वकिलांनी ताज आणि ओबेरॉय हॉटेलचा दाखला देत मल्टिप्लेक्सचे समर्थन केलेय. आम्ही सेवा आणि लक्झरी पुरवतो. त्यामुळे या वस्तू महाग असल्याची बाजू मल्टिप्लेक्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकिलांनी मांडली. तुम्ही ताज आणि ओबेरॉयसारख्या हॉटेलांमध्ये १० रुपयांना चहा विकायला सांगू शकाल का, असा सवाल उपस्थित केलाय.