मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan)आणि अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant)यांना काही महिन्यांपूर्वी मुंबईत क्रूज ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. काही दिवसांच्या कारावासानंतर आणि वकिलांच्या अनेक प्रयत्नांनंतर अरबाज आणि आर्यनची सुटका झाली.
सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतरही काही दिवस आर्यनला एनसीबी कार्यालयात हजेरीसाठी यावं लागत होतं.
न्यायालयानं जामीन देताना काही अटी आर्यन आणि अरबाजपुढे ठेवल्या होत्या. ज्यामध्ये त्या दोघांनीही परवानगीशिवाय एकमेकांना भेटू नये अशीही अट असल्याचं सांगण्यात आलं होतं.
पण, आता मात्र आपल्या चांगल्या मित्राला म्हणजेच आर्यनला भेटण्यासाठी अरबाज मर्चंट यानं मोठं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अरबाज आता आर्यनला न भेटण्याची ही अट मागे घ्यावी अशी विनंती थेट न्यायालयाकडे करणार आहे.
अरबाजचे वडील असलम मर्चंट यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. हे ऐकून अनेकांना धक्का बसत आहे.
आपला मुलगा त्याचा सर्वात जवळचा मित्र आर्यन याला भेटू इच्छितो, त्याला त्याची फारच आठवण येत आहे, असं ते म्हणाले.
ही अट न्यायालयानं मागे घ्यावी यासाठी आपला मुलगा न्यायालयाकडे आर्जव करणार असल्याचं ते म्हणाले.
अरबाजला एनसीबी कार्यालयात जाण्यासाठी कोणतीच अडचण नाही. पण, सध्या मात्र तो त्याच्या मित्राला म्हणजेच आर्यनला भेटू इच्छितो, त्याच्याशी बोलू इच्छितो. म्हणूनच त्यानं हे पाऊल उचललं आहे, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली.
काय आहे ड्रग्ज प्रकरण ?
आर्यन आणि अरबाजला एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021ला ड्रग्ज प्रकरणा ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली होती.
जवळपास 1 महिना कारागृहात राहिल्यानंतर या दोघांनाही न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार आर्यन आणि अरबाज एकमेकांचे चांगले मित्र आहेत. क्रूजवरही त्यांना एकमेकांसोबत पाहिलं गेलं होतं. ज्यानंतर त्यांच्या अडचणी वाढत गेल्या होत्या.