मुंबई : एका बाळाला जन्म देणं, अर्थात आई होणं ही साधीसोपी बाब नाही. अनेक सुखं या अनुभवापुढे लोळण घालतात. पण, एका स्त्रीला मात्र यासाठी बऱ्याच वेदनांतून जावं लागलं. किंबहुना बाळाच्या जन्मानंतरही मातेचा सुरु असणारा संघर्ष काही केल्या थांबत नाही. गर्भात होणारी बाळाची वाढ आणि त्यानंतरची प्रसूती या साऱ्यानंतर महिलांच्या पोटावर व्रण अर्थात स्ट्रेच मार्क्स तसेच राहतात. व्यायाम वगैरे करुन शरीराचा बांधा पुन्हा सुडौल करता येतो पण, या खुणा मात्र अनेकदा जात नाहीत. मग, सुरु होतात त्यांना लपवण्याचे प्रयत्न.
पोटावर असणाऱ्या या खुणांबाबतच इंफ्लुएन्सर आणि मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपा भुल्लर खोसला हिनं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. गरोदरपणानंतरचं शरीर नेमकं कसं दिसतं हे सांगणारा अतिशय बोलता फोटो दीपानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पोटावर असणारे स्ट्रेच मार्स्क गर्वानं मिरवताना दिसत आहे. मुख्य म्हणजे असं करण्यापूर्वी तिच्या मनातही याविषयी झालेली कालवाकालव तिनं कॅप्शनवाटे सर्वांना सांगितली आहे.
'कुतूहल हे की प्रसूतीनंतर जवळपास साडेतीन महिन्यांनंतर माझं शरीर कसं दिसेल? तर, हे पाहा असं दिसेल. तर, मी गरोदरपणानंतर पुन्हा शरीरावर ताबा कसा मिळवला असं विचारणाऱ्या मातांना मी सांगू इच्छिते की बाळाला जन्म देण्यानं शरीरात मोठे बदल होतात. किंबहुना माझ्या त्वचेवरचा हा वाढीव भाग स्वीकारणं मलाही कधीकधी कठीण होतं. खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवत आणि व्यायाम करण्यात सातत्य राखत असतानाही माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की, माझं शरीर पूर्ववत होणार नाही आणि ते पूर्णपणे स्वीकारार्ह आहे. त्यात काहीच वावगं नाही.
हे शरीर कधी एकेकाळी दुसऱ्या एका जीवाचा आसरा होतं. याच शरीरानं मी आज हातात धरलेल्या या बाळाला वाढवलं. त्यामुळं याच शरीराशी मी प्रामाणिक कशी असू शकत नाही? या एका मातृत्त्वाच्या संघर्षाच्या, युद्धाच्या खुणा आहेत. अद्यापही मी काही अंशी त्या स्वीकारल्या नसल्या (उन्हाळ्यात विशेष) तरीही मी या खुणांना गर्वानं मिरवतेय.'
प्रत्येक महिला ही गरोदरपणात, त्यानंतरच्या काळात तिच्या अनुषंगानं जादुई पद्धतीनं बदलेल आणि हे योग्यच आहे. हे सुंदर आहे, असा सुरेख संदेश देत तिनं सर्वांच्याच डोळ्यांवर असणारा पडदा दूर केला. आई होण्याचं सुख म्हणजे नेमकं काय हे दीपाची ही पोस्ट वाचताना लक्षात येत आहे.