'गोविंदाने एकाच वेळी अनेक चित्रपट साईन केले, रोज एकच तास शूट करायचा,' दिग्दर्शकाचा खुलासा, 'तुला जर अभिनेता...'

गोविंदाने (Govinda) 1986 मध्ये बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केलं. 1989 मध्ये त्याने 14 चित्रपट साईन केले होते. यावेळी तो प्रत्येक चित्रपटासाठी दिवसातील एक किंवा दोन तासच देत असे. यामुळे निर्माते, दिग्दर्शक यांनाही चित्रपट पूर्ण करताना अडचण येत होती.    

शिवराज यादव | Updated: Jul 22, 2024, 04:31 PM IST
'गोविंदाने एकाच वेळी अनेक चित्रपट साईन केले, रोज एकच तास शूट करायचा,' दिग्दर्शकाचा खुलासा, 'तुला जर अभिनेता...' title=

बॉलिवूडमध्ये गोविंदाने (Govinda) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दमदार अभिनय आणि हटके डान्स यामुळे त्याने आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता, जो आजही टिकून आहे. गोविंदाने 3 दशकांमध्ये जवळपास 165 चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली. पण एकेकाळी यशाच्या शिखरावर असणाऱ्या गोविंदाच्या करिअरला नंतर मात्र उतरती कळा लागली. यासाठी त्याचा बेजबाबदारपणाच कारणीभूत ठरला असून बॉलिवूडमध्ये याची नेहमी चर्चा असते. सेटवर सतत उशिरा येण्यासाठी तर गोविंदा प्रसिद्ध असून, यासाठीच अनेक निर्माते त्याच्यासह काम करणं टाळतात. नुकतंच गोविंदासह अनेक वेळा काम करणारे दिग्दर्शक मेहुल कुमार (Mehul Kumar) यांनीही अशीच माहिती दिली आहे. गोविंदा दिवसातील एक किंवा दोन तासच चित्रपटासाठी द्यायचा ज्यामुळे एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट्स रखडत होते अशी माहिती त्यांनी दिली. 

1986 मध्ये डेब्यू करणाऱ्या गोविंदाने त्या एका वर्षात पाच चित्रपटांमध्ये काम केलं. 1987 मध्ये  6, 1988 मध्ये 11 आणि 1989 मध्ये 14 चित्रपटांमध्ये काम केलं. 1989 मधील 'आसमान से उंचा' चित्रपटाच्या शुटिंगची आठवण सांगताना मेहुल कुमार म्हणाले, "या चित्रपटावेळी गोविंदा इतका व्यस्त होता की तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी फक्त एक किंवा दोन तास द्यायचा." गोविंदा अनेकदा सेटवर उशिरा पोहोचण्यासाठी आणि कधीकधी त्या रद्द करण्यासाठीही ओळखला जात होता. 

“आसमान से उंचा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मलाही या समस्येचा सामना करावा लागला. आम्ही काश्मीरमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत होतो आणि तिथे एक फाईट सीक्वेन्स शूट करायचा बाकी होता. पण प्रचंड बर्फवृष्टीमुळे आम्हाला शूट रद्द करावे लागले. मी गोविंदाला म्हणालो, 'आज शेवटचा दिवस आहे, संपूर्ण युनिट इथे आहे, कृपया तू थांब आणि शूट पूर्ण कर'. त्यावर तो 'मी करू शकत नाही' म्हणाला. मी म्हटलं ठीक आहे, तू जा मी तुझ्याशिवाय शूट पूर्ण करतो. त्यावर तो कसं काय असं विचारु लागल्यावर मी म्हटलं ते पाहिल्यावर तुला कळेल. मी त्याचे क्लोज अप शॉट्स वापरले आणि बॉडी डबल वापरली. मी गोविंदाला स्पष्टपणे सांगितले की, 'मी इतके चित्रपट केले आहेत की, जेव्हा एखादा कलाकार नाटकं करु लागतो तेव्हा मी त्याच्याशिवाय चित्रपट बनवू शकतो.. मी त्याला म्हटलं की, जर तुला अभिनेता म्हणून जास्त काळासाठी टिकायचं असेल तर अशा गोष्टींची काळजी घ्यावी लागेल," अशी आठवण मेहुल कुमार यांनी सांगितली. 

तो मला फक्त एक किंवा दोन तास देत असे. इतक्या ठराविक वेळेत काम करणं कठीण आहे असंही ते म्हणाले. यापूर्वी, ॲडमॅन प्रल्हाद कक्कड यांनीही अशीच एक घटना सांगितली होती, ज्यावेळी गोविंदा त्यांच्यासोबत हैदराबादमध्ये शूट करणार होता. ते म्हणाले, “आम्ही हैदराबादमध्ये एका मोठ्या सेटवर होतो आणि तो श्रीनगरहून येणार होता. तो म्हणाला, ‘काळजी करू नकोस, मी वेळेवर पोहोचेन’. मी म्हणालो, 'कसा येणार तू? तुझ्याकडे तर विमानही नाही. तो म्हणाला, ‘मी गाडीने येतो नाा’.

यानंतर गोविंदा सेटवर दोन दिवस उशिरा आला होता. आणखी एका घटनेची आठवण करून देताना प्रल्हाद म्हणाले होते, “आमच्याकडेहा प्रचंड मोठा टायटॅनिक सेट होता, त्याच्यासोबत एक मुलगीही होती. तो आत आला सेटकडे पाहिलं आणि म्हणाला 'लवकर करा, मला जायचं आहे'. मी म्हटलं, ‘नाही, तुला हे पूर्ण करावं लागेल. संपूर्ण सेट तुझ्यासाठी उभा आहे.''