मुंबई : झी मराठीवरील प्रेक्षकांना खळखळून हसण्यासाठी पुन्हा एक नवी मालिका सुरू झाली आहे आणि ती म्हणजे ''जागो मोहन प्यारे" सुप्रिया पाठारे, अतुल परचुरे आणि श्रृती मराठे या जबरदस्त स्टारकास्टने ही मालिका सजलेली आहे.
सुप्रिया पाठारे ही अशी अभिनेत्री आहे जी निगेटिव्ह भूमिका, गंभीर भूमिका किंवा अगदी विनोदी भूमिकेत स्वतःला १०० टक्के प्रेझेंट करत असते. आणि ती प्रेक्षकांना हवीहवीशी वाटते. या अभिनेत्रीची 'पुढचं पाऊल' या मालिकेतील कांचनमालाबाईंच्या निगेटिव्ह भूमिका आणि 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील श्रीची मोठी आई या भूमिका अतिशय गाजल्या. आता या मालिकानंतर त्या प्रेक्षकांना पोटधरुन हसवायला सज्ज झाल्या आहेत. १४ ऑगस्टपासून 'जागो मोहन प्यारे' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सुप्रिया यांच्यासोबत अतुल परचुरे आणि श्रुती मराठे या कलाकारांच्या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. सुप्रिया आणि अतुल परचुरे मालिकेत पती-पत्नीच्या भूमिकेत असून श्रृतीने जिनीची भूमिका वठवली आहे.
या मालिकेनिमित्त अभिनेत्री सुप्रिया पाठारेच्या जीवनातील एक कटू प्रसंग पुन्हा चर्चेत आला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी हस्तक्षेप केला नसता तर सुप्रिया पाठारे त्या संकटातून बाहेर पडल्या नसत्या. त्यामुळे कायम वेगवेगळ्या भूमिका बजावत असताना सुप्रिया पाठारे बाळासाहेबांची कृतज्ञता व्यक्त करतात.
१९९५ साली सुप्रिया पाठारेवर आले होते मोठे संकट. एका निर्मात्याने मला तीन महिने डांबून ठेवले होते मात्र दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर माझी सुटका झाल्याचे सुप्रिया पाठारे यांनी एका कार्यक्रमात उघड केले होते. आणि कायम त्या याच्या स्मरणात राहतात.
सुप्रिया म्हणाल्या होत्या, "१९९५ मध्ये एक चित्रपट निर्मात्याने मला चित्रीकरणासाठी राजस्थानला नेले व तिथे मला त्याने तीन महिने डांबून ठेवले होते. या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रातून मी एकटीच होते. पुढील तीन महिने निर्मात्याने बंदुकीच्या धाकावर माझ्याकडून अभिनय करवून घेतला. मला तिथल्याच परिसरात डांबले होते."
सुप्रिया यांनी सांगितले होते, की त्या निर्मात्याने मला माझ्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधण्याची परवानगी दिली होती. तो निर्माता मला मराठीत बोलू नको, असा सारखा दम देत होता. पण मी कसेतरी बहिणीला गुप्त भाषेत माझ्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मुंबईत असलेल्या माझ्या कुटुंबियांनी शिवसेनाप्रमुखांकडे मदतीची विनंती केली. यानंतर बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.
एक दिवस राजस्थान पोलिसांतील ५० शिपाई माझ्या शोधासाठी आले आणि माझी सुटका केली. त्यानंतर मला कळले, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. २० तासांचा प्रवास करुन मी सुरतला पोहोचले आणि यावेळी माझ्याकडे अवघे १२रुपये शिल्लक राहिले होते. मोठ्या संकटातून सुखरुप सुटकेसाठी मी आयुष्यभर बाळासाहेबांची ऋणी राहिन असे सुप्रिया पाठारे म्हणाल्या होत्या. यावेळी पाठारे यांनी निर्मात्याचे नाव आणि घटनास्थळाचा नेमका पत्ता याचा खुलासा केला नाही. पण हा प्रसंग आठवला तर त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो.