मुंबई : गणेशोत्सवाचे दिवस संपल्यानंतर नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच आला आहे. त्यामागोमागच दसरा आणि दिवाळी असे सणही आहेतच. याच सणावारांच्या दिवसांचं औचित्य साधत पुन्हा एकदा 'भाडिपा' या युट्युब चॅनलने एक नवा व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये मराठी माणूस नेमका असतो तरी कसा, याचंच चित्रण या व्हिडिओमध्ये करण्यात आलं आहे.
अमुक एका कंपनीमध्ये अप्रायजलनंतर जर कोणत्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहिली जाते ती म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने मिळणाऱ्या बोनसची. हीच बाब हेरत, 'बोनस आला का.....?' इथपासून अगदी घराच्या साफसफाईपर्यंत बऱ्याच गोष्टींवर या व्हिडिओतून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
सविता प्रभुणे, सुनील अभ्यंकर, इंद्रजीत मोरे, सायली पाटील, सारंग साठ्ये यांचा सहभाग असणारा हा व्हिडिओ पाहताना नकळतच त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये आपण आपल्या आजुबाजूच्यांचा आणि काही प्रसंगी स्वत:चाही शोध घेऊ लागतो. घरामध्ये साफसफाईच्या वेळी आई, मुलांशी गोड बोलून कसं काम करुन घेते हे दाखवतानाच, या कामांदरम्यान आईवडिलांमध्ये कसे लहानसहान गोष्टींवरुन मजेशीर खटके उडतात हेसुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
दिवाळी किंवा सणावाराचे दिवस आल्यावर या साऱ्यामध्ये सर्वाधिक चिंता लागलेली असते ती म्हणजे, बजेट अर्थाच खर्चाची जुवळवाजुळव करण्याची. यामध्येच मग सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या ऑनलाईन खरेदी आणि त्यावर असणाऱ्या अमाप सवलतीसुद्धा या व्हिडिओमध्ये अधोरेखित करण्यात आल्या आहेत. तर मग, यंदाच्या दिवाळीसाठी तुमची तयारी कुठवर आली?