Mahesh Manjrekar Juna Furniture First Poster : मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना ओळखले जाते. महेश मांजरेकरांचा मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही तितकाच दबदबा आहे. आता महेश मांजरेकर लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जुनं फर्निचर असे या चित्रपटाचे नाव आहे. येत्या 26 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे.
सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर लाँच सोहळा दिमाखात पार पडला होता. यात महेश मांजरेकरांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळाली होती. आता या चित्रपटातील इतर कलाकारांची नावं समोर आली आहेत. तसेच या चित्रपटातील त्यांची झलकही समोर आली आहे.
'जुनं फर्निचर' या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतंच समोर आलं आहे. यात महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर दिसत आहेत. या पोस्टरमध्ये न्यायालय, न्यायधीश आणि काही कागदपत्रे पाहायला मिळत आहे. त्यावर न्याय, हक्क, कायदा असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे आता ही कोणती लढाई लढली जाणार आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपटातून मिळणार आहे.
या चित्रपटात समीर धर्माधिकारी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. यासोबत या चित्रपटात ओंकार भोजने, शिवाजी साटम यांचीही झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले आहे. तर यतिन जाधव हे 'जुनं फर्निचर'चे निर्माते आहेत.
''जुन्या फर्निचरमध्ये किती ताकद असते, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा लढा यात दाखवण्यात आला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जात असतील, परंतु ही प्रकरणे समोर येत नाहीत. मी म्हणेन प्रत्येक तरूणाने आपल्या पालकांसोबत हा चित्रपट पाहावा, जेणे करून त्यांचा दृष्टिकोन बदलेल.'' असे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे.