Marathi Celebrity On Atal Setu Bridge : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचा लोकार्पण सोहळा अखेर पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हा तब्बल 22 किमीचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत करणं शक्य होणार आहे. याच निमित्ताने प्रसिद्ध मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या आहेत.
मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजे अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या उद्घाटनानंतर मराठी अभिनेता शशांक केतकरने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. त्याबरोबर त्याने एक व्हिडीओ शेअर करत या नव्या शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूची झलकही दाखवली आहे.
"१९६३ पासून रखडलेल्या सागरी सेतूचा प्रकल्प मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात हिरीरीने हाती घेतला आणि आज म्हणजेच १२ जानेवारी २०२४ रोजी, त्याच महाकाय अशा अटल सेतूचे उद्घाटन मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट!, असे शशांक केतकरने म्हटले आहे.
शशांक केतकरसोबतच अभिनेत्री शिवानी बावकरनेही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचे कौतुक केले आहे. "या अटल सेतू नामक भव्य सागरी सेतूमुळे इंधनाची बचत होऊन मुंबई व नवी मुंबई मधील संपर्क यंत्रणा अधिक वाढून वाढत्या रहदारीच्या समस्या कमी होणार आहेत. मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज (१२ जानेवारी २०२४) मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या हस्ते होणार आहे", असे शिवानी बावकरने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू हा सहा पदरी आहे. हा सागरी सेतू 21.5 किमी अंतराचा असून तो मुंबईतील शिवडी येथून सुरु होऊन रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा शेवापर्यंत जोडण्यात आला आहे. यासाठी तब्बल 18 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. 16.5 किमी सेतू समुद्रावर आणि उर्वरित 5.5 किमीचा सेतू भूभागावर उभारण्यात आला आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या सागरी सेतूला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू असं अधिकृत नाव देण्यात आलं आहे.