बेपत्ता मुलांची रवानगी बालगृहात, सुकन्या मोनेंच्या व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग

सुकन्या मोने यांच्या व्हिडीओवर सोलापूर जिल्हा बाल सरंक्षण विभागाने कारवाई केली आहे. त्याबद्दल पोस्ट करत त्यांनी आभार मानले आहेत. 

Updated: Feb 3, 2024, 06:36 PM IST
बेपत्ता मुलांची रवानगी बालगृहात, सुकन्या मोनेंच्या व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग title=

'बाईपण भारी देवा' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री सुकन्या मोने या कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. सुकन्या मोने यांनी काल एक धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला होता. याबरोबरच त्यांनी याची दखल कोणी घेईल का? असा प्रश्नही विचारला होता. आता त्यावर सोलापूर जिल्हा बाल सरंक्षण विभागाने कारवाई केली आहे. याबद्दल सुकन्या मोने यांनी पोस्ट करत त्यांचे आभार मानले आहेत. 

 सुकन्या मोने यांनी काल इन्स्टाग्रामवर एक व्हायरल व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ सोलापूरमधील एका जत्रेचा असल्याचे सांगितलं जात आहे. या जत्रेत काही लहान मुलांच्या अंगाला रंग फासून त्यांना पैसे मागण्यासाठी उभं करण्यात आलं आहे. यात जत्रेत येणारी जाणारी माणसं ही त्यांच्या समोर असलेल्या बास्केटमध्ये पैसे टाकताना दिसत होते. 

आणखी वाचा : जत्रेतील 'त्या' बालकांचा व्हिडीओ पाहून सुकन्या मोने अस्वस्थ, म्हणाल्या 'आपल्या मुला-मुलींना...'

 

यावर सुकन्या मोने यांनी पोस्ट शेअर केली होती. "मला एका what's app group वर हा video आला आणि अस्वस्थ झाले. सदर मुले ही आपणा पैकीच कोणाची तरी बेपत्ता झालेली असु शकतात? कुठलेच माय-बाप आपल्या मुला-मुलींना अश्या पद्धतीने पैश्यांन साठी उघड्याने नाही सोडत, हे सगळे संशयस्पद आहे..!! कोणी ह्याची दखल घेईल का?" असा प्रश्न सुकन्या मोनेंनी केला होता. 

आता त्यावर संबंधित प्रशासनाने कारवाई केली आहे. त्याबद्दल सुकन्या मोनेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. काल मी लहान बालकांना पळवून त्यांची काय गत करतात ह्या संदर्भात एक forwarded video post केला होता.ह्याच उद्देशाने की कोणीतरी ह्याची दखल घेईल आणि त्या प्रमाणे आपल्या प्रशासनाने ताबडतोब त्याची दखल घेतली आणि कृतीही केली. ज्यांनी हा तळमळीने video काढला आणि ज्यांनी हा viral केला.... त्यावर श्री.अतुल वाघमारे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,सोलापूर ह्यांनी लगेच कृती केली त्याबद्दल प्रशासनाचे आभार! जेव्हा जेव्हा समाजामध्ये अश्या चुकीच्या,गैर गोष्टी समाजामध्ये होत असतील तेव्हा तेव्हा आपण ह्या माध्यमाचा उपयोग केला पाहिजे.योग्य त्या व्यक्ती पर्यंत ती बातमी पोचली पाहिजे, असे सुकन्या मोने यांनी म्हटले आहे.

त्याबरोबरच सुकन्या मोने यांनी एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. यात पोलीस प्रशासनाने या सर्व बालकांना बालगृहात दाखल केल्याचे सांगितले आहे.  दरम्यान सुकन्या मोने यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांच्या या सामाजिक भानाचे सर्वजण कौतुक करत आहेत. अनेक जण सुकन्या ताई तुम्ही खूप छान काम केले, असे म्हणत त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.