'चौथ्या सीटवर बसणं म्हणजे...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही करते लोकल ट्रेनने प्रवास

या व्हिडीओत ती लोकल रेल्वेने प्रवास करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना नेमकं काय घडलं याबद्दलही सांगितले आहे.

Updated: Feb 3, 2024, 05:58 PM IST
'चौथ्या सीटवर बसणं म्हणजे...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही करते लोकल ट्रेनने प्रवास  title=

Jui Gadkari Local Train : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखलं जातं. तिने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जुईने ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेत ‘चंदा’ ही सहायक भूमिका साकारत मालिका विश्वात पदार्पण केलं होतं.  ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने कल्याणी ही भूमिका साकारली होती. सध्या जुई ही 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण अभिनेत्री असूनही जुई ही कायम रेल्वेने प्रवास करते. 

जुई गडकरी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. जुईने नुकतंच तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती लोकल रेल्वेने प्रवास करत असल्याचे दिसत आहे. यात तिच्या शेजारी बसलेल्या दोन मुली या 'ठरलं तर मग' ही मालिका बघताना दिसत आहेत. तिने हा व्हिडीओ पोस्ट करताना नेमकं काय घडलं याबद्दलही सांगितले आहे.

जुई गडकरी काय म्हणाली?

"सुख म्हणजे नक्की काय असतं?! नेहमीप्रमाणे आजही मी कर्जतला जायला रेल्वेने प्रवास करत होते! बसायला “4th seat” मिळाली होती! आता 4th seat वर बसायचं म्हणजे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही असं अवघड जागेचं दुखणं!!!! पण थोड्याच वेळात promotion मिळालं आणि मी 3rd seat वर आले! आणि क्षणार्धात मला कळलं सुख म्हणजे नक्की काय असतं!!! माझ्या बाजुच्या दोघीजणी “ठरलं तर मग” बघत होत्या!!! काय भारी वाटलं मला!!! दोघींचे चेहरे मोबाईलवर टीपता आले नाही पण त्यांच्या चेहऱ्यावर खुप आनंद होता!!

मग काय! प्रवासाचा सगळा थकवा लग्गेच निघुन गेला आणि मी त्यांचे चेहरे बघत कर्जतला केव्हा पोहोचले कळ्ळंच नाही! आज पुन्हा एकदा जाणवलं आपण “मायबाप रसिक प्रेक्षक” असं का म्हणतो!! देवाचे पुन्हा एकदा आभार मला एका सुंदर प्रोजेक्टचा भाग केल्या बद्दल! ॥जय गुरुदेव दत्त॥", असे जुई गडकरीने म्हटले आहे. 

दरम्यान जुई गडकरी ही कायम ‘ठरलं तर मग’ मालिकेचा सेट ते कर्जतचं घर हा प्रवास रेल्वेने करते. तिची ही पोस्ट वाचून अनेक चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘ठरलं तर मग’ या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. यात सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कथा ही सुपरहिट ठरताना दिसत आहे. या मालिकेत जुई गडकरीसह अमित भानुशाली, प्रिया तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, सागर तळाशीर, मोनिका दबडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.