'हा सर्व कचरा उचलून BMC ऑफिससमोर...', शशांक केतकरचा संताप, म्हणाला 'मोदीजी, राहुलजी किंवा...'

 शशांकने मुंबईतील रस्त्याच्या अस्वच्छतेबद्दल एक संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. याबद्दल त्याने एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. 

Updated: Jun 13, 2024, 02:48 PM IST
'हा सर्व कचरा उचलून BMC ऑफिससमोर...', शशांक केतकरचा संताप, म्हणाला 'मोदीजी, राहुलजी किंवा...' title=

Shashank Ketkar: ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. तो कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. शशांक हा अनेक गोष्टींबद्दल स्पष्टपणे मत मांडत असतो. आता शशांकने मुंबईतील रस्त्याच्या अस्वच्छतेबद्दल एक संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. याबद्दल त्याने एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. 

शशांक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच शशांकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने मुंबईतील रस्त्यालगत ठेवलेली एक कचरापेटी दिसत आहे. या कचरा पेटीच्या परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. यावेळी कचरापेटीपेक्षा रस्त्यावरच जास्त कचरा पडलेला पाहायला मिळत आहे.  

आपण कोडगे झालोय का? 

"फिल्मसिटीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर ही अवस्था आहे स्वच्छतेची. जेव्हा परदेशातून लोक इथे फिल्मसिटी बघायला येतील तेव्हा हे चित्र असेल. मी अर्धा तासापूर्वी फिल्मसिटीमध्ये जात असताना मला हा कचरा दिसला. जर ही अवस्था मुंबईतील एका आयकॉनिक ठिकाणाची असेल. यात पालिकेची, नेत्यांची, कचरा उचलणाऱ्या सर्वांचीच चूक आहे किंवा कोणाचीच चूक नाही. का आपण कोडगे झालो आहे?" असा प्रश्न शशांकने या व्हिडीओसोबत उपस्थित केला आहे. 

शशांक केतकरची पोस्ट

"मेरा भारत महान. मोदीजी असोत, राहूलजी असोत किंवा माझ्यासारखी सामान्य जनता असो, हे चित्र भारतात कुठेच अपेक्षित नाहीये. !!!!! मुंबईची @my_bmc filmcity बघायला भारतातून, जगभरातून लोक येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा इतका सुंदर परिसर असावा ही कल्पना कोणाची ???? ही अवस्था , हे चित्र काही आजचं नाहीये… मी गेल्या १० वर्षात ती जागा कधीच स्वच्छ पाहिली नाहीये. इतकी उदासीनता का? हा सगळा कचरा उचलून BMC office समोर ओतला तर आवडेल????? येणारे पर्यटक, कलाकार आणि तिथे राहणारे नागरीक, सगळ्यांच्या माथी हा असला घाणेरडा परिसर का मारला आहे?" असे शशांक केतकरने पोस्टमध्ये म्हटले आहे. 

शशांकच्या या पोस्टवर अभिनेत्री अभिज्ञा भावेनेही एक कमेंट केली आहे. तिने यावर "अगदी खरंय शशांक" असे म्हणत त्याला पाठिंबा दिला आहे. त्यावर शशांकने "कोडगे झालोय आपण... आणि हेच encash केलं जातं", असे म्हटले आहे.