Prasad Oak On NCP Sharad Pawar : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखले जाते. प्रसादने अभिनयासोबतच दिग्दर्शक म्हणूनही प्रेक्षकांची मने जिंकली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. सध्या प्रसाद ओक हा ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान प्रसाद ओकने त्याला कोणत्या राजकीय नेत्याच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल, याबद्दल भाष्य केले.
प्रसाद ओक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. तसेच सध्या तो विविध चित्रपटांच्या शूटींगचे अपडेटही देताना दिसतो. आता नुकतंच प्रसाद ओकने महाराष्ट्र टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रसाद ओकला तुला कोणाची भूमिका साकारायला आवडेल आणि तू कोणावर बायोपिक बनवशील असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने फारच हटके पद्धतीने उत्तर दिले.
“मला सदाशिवराव पेशवे यांची भूमिका साकारायला आवडेल. तसेच अण्णा हजारे, वपू काळे, जब्बार पटेल यांच्या भूमिकाही करायला मला आवडतील. यासोबतच मला पडद्यावर माननीय शरदचंद्रजी पवार साकारायला आवडतील किंवा मला त्यांचा बायोपिक बनवायला आवडेल. शरद पवार हे महाराष्ट्रातील फार मोठे नेते आहेत. या सगळ्या व्यक्तींच्या भूमिका मला नक्कीच साकरायला आवडतील. तसेच जर मला कोणी दिग्दर्शनसाठी विचारले, तर मी तेदेखील करेन” असे प्रसाद ओक म्हणाला.
दरम्यान प्रसाद ओक हा मराठी मनोरंजनसृष्टीमधील सध्याचा अष्टपैलू अभिनेता आहे. येत्या वर्षात प्रसादचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘धर्मवीर २’, ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘महापरिनिर्वाण’ अशा अनेक चित्रपटांचे शूटींग सध्या सुरु आहेत. त्यासोबतच प्रसाद हा सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातही परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. धर्मवीरचा पहिला भाग प्रचंड गाजला. या चित्रपटात आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडण्यात आला होता. यात प्रसादने साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक देखील करण्यात आलं. आता लवकरच 'धर्मवीर 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.