हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) लोकसभा निवडणूक (LokSabha Election) जिंकणारी नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानशिलात लगावल्याने वाद निर्माण झाला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर सीआयएसएफची महिला जवान कुलविंदर कौरने कंगनाच्या कानाखाली मारली. यानंतर यावर प्रतिक्रिया उमटत असताना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही त्यावर भाष्य केलं आहे.
नाना पाटेकर यांना प्रसारमाध्यमांकडून कंगनाला कानशिलात लगावण्यात आली असल्याची माहिती मिळाली. त्यावर त्यांनी हे फारच चुकीचं असून, असं होऊ नये अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान त्यांनी यावेळी सरकारचं कौतुक करताना आतापर्यंत चांगलं काम केलं आहे आणि पुढेही काम करतीत असा विश्वास व्यक्त केला आहे.
#WATCH | Actor Nana Patekar says, "We will put forth our issues and the government did a lot of good work...We will keep trying."
On Kangana Ranaut slapped by CISF woman constable, he says, "It is wrong and it should not have happened" pic.twitter.com/nnQTqNEVTf
— ANI (@ANI) June 7, 2024
"हे सरकार चांगलं काम करेल अशी आशा आहे. कधीही नकारात्मक दृष्टीकोन ठेवू नये, आता विरोधकही मजबूत आहेत. दोघे मिळून चांगलं काम करतील," असं नाना पाटेकर म्हणाले. सरकारने कोणत्या मुद्द्यांवर काम करावं हे समजत असतो तर मीच राजकारणात गेलो असतो. आपल्याला जे जमतं ते काम करत आहोत. आम्ही पाण्यासंबंधी काम करतो असंही त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, "प्रत्येकाने आपल्या ताकदीने काम केलं तर चांगलं होईल. एखाद्याला शिव्या देणं, नाव ठेवणं सोपं असतं. आपली जी औकाद आहे त्यानुसार काम केलं तर बरं होईल. शेतकरी 100 रुपये खर्च करत असेल तर 150 रुपये मोबदला मिळावा अशी आशा असते. तसं झालं तर आम्ही त्यानंतर आम्ही काहीच मागणी करणार नाही".
हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून निवडणूक जिंकणारी कंगना रणौत दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. यावेळी सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरने कंगना रणौतच्या कानाखाली लगावली. या घटनेचा व्हिडीओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओत कंगना चेक इन काऊंटवर पोहोचल्यानंतर शाब्दिक वाद होताना दिसत आहे. पण व्हिडीओत कानाखाली लगावतानाचा क्षण कैद झालेला नाही.
या घटनेनंतर कंगना रणौतने व्हिडीओ जारी करत आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. तसंच पंजाबमधील वाढत्या दहशतवादावर चिंता व्यक्त केली होती. "मी सुरक्षित आहे. मी पूर्णपणे ठीक आहे. सुरक्षा तपासणीच्या वेळी ही घटना घडली. महिला सुरक्षारक्षकाने मी तेथून बाहेर पडण्याची वाट पाहिली. नंतर तिने बाजूने येऊन माझ्यावर हात उचलला. मी विचारलं की मला का मारलं? ती म्हणाली, 'मी शेतकऱ्यांचे समर्थन करते'. मी सुरक्षित आहे, पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादाची मला चिंता आहे. ते आपण कसं हाताळणार आहोत?", असं कंगनाने व्हिडीओत सांगितलं होतं.
कंगनाला कानशिलात लगावणारी कॉन्सटेबल कुलविंदर कौरने तिने शेतकऱ्यांचा अनादर केल्याने कानाखाली लगावल्याचं सांगितलं. "कंगनाने 100 रुपये घेऊन आंदोलन करत असल्याचं म्हटलं होतं. ती तिथे जाऊन बसणार आहे का? माझी आई तिथे आंदोलनाला बली होती. त्यावेळी तिने हे विधान केलं होतं," असं तिने सांगितलं होतं. दरम्यान कुलविंदर कौरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.