'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होणार? कुशल बद्रिकेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाला 'कामाचं प्रेशर आणि...'

आता लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Updated: Mar 3, 2024, 05:39 PM IST
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होणार? कुशल बद्रिकेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाला 'कामाचं प्रेशर आणि...' title=

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी एक म्हणून या कार्यक्रमाला ओळखले जाते. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण आता लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. आता कुशल बद्रिकेने झी मराठी वाहिनीसह चला हवा येऊ द्या या कार्यक्रमासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तो एका आभार-पत्राचे वाचन करताना दिसत आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमाने आयुष्यात आणलेले बदल सांगणारं आणि zee मराठी ला “Thank you” म्हणणारं छोटसं आभार-पत्र, असे कॅप्शन कुशलने या व्हिडीओला दिले आहे.  

कुशल बद्रिकेचे 'झी मराठी'साठी खास पत्र

"प्रिय झी मराठी, तशी आपली मैत्री हसा चकट फू पासूनची, पण ती सर्वाथाने फुलली ती या 10 वर्षात. लहानपणी आभाळात उडणारं विमान पाहिलं की वाटायचं मी सुद्धा कधीतरी त्यात बसेन. पण आता कधी एकदा या विमानातून उतरेन असं वाटेपर्यंत तुम्ही विमान प्रवास घडवलात. आमच्या सगळ्यांची, आमच्या डोळ्यासमोर एकाची दोन घरं आणि घरासमोर दोनाची चार चाकं झाली. नंतर त्याच घरात दोनाचे चार हात झाले. मग काहींनी त्या चार हातांचे सहा हात केले, काहींनी तर अगदी बारा-बारा हात केले. पण त्यात तुमचा काही हात नाही. त्यामुळे तो विषय सोडा.... 

तुमच्यामुळे आईच्या डोळ्यात बऱ्याचदा अभिमानाने पाणी दाटून आलं त्याची किंमत मोजता न येणारी आहे. आईच्या पापण्यांच्या शिंपल्यात नंतर त्या पाण्याचे मोती झाले, त्याची मात्र किंमत डॉक्टरांकडे मोजावी लागली. पण ते जाऊद्या... कामाचं प्रेशर आणि लोकांच्या प्रेमाचा गोडवा दोन्हीही रक्तात उतरल्यामुळे ब्लड प्रेशर आणि शुगर यांच्याशी आता रक्ताचं नातं जोडलं गेलंय. या कार्यक्रमाने जसं जग फिरवलं, तसं आपल्या आजूबाजूचं जग ओळखायलाही शिकवलं. कोणाचा का कोंबडा आरवेना, दिवस उगवल्याशी मतलब असणारी मतलबी माणसं आणि आपल्याच आरवण्याने दिवस उगवला म्हणणारे कोंबडे सुद्धा पाहिले. 

उगवत्या सूर्याला सलाम ठोकणाऱ्यांच्या दुनियेत रात्रीच्या अंधारात ऊब देणाऱ्या घराची किंमत कळली आणि एक गोष्ट कळली पेरलेलं आनंदाच बीज हे एखाद्या वटवृक्षासारखं असतं, त्याच्या पारंब्यांमधूनही आनंदाचंच झाड उगवतं. फक्त जमीन सुटता कामा नये. एवढी मात्र काळजी आपण घ्यायला हवी. थँक्यू, थँक्यू झी मराठी", असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे. 

कुशलच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी यावर हार्ट इमोजी पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेक चाहत्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. "खुप सुंदर लिहिलं आहेस", अशा अनेक कमेंट त्याच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.