Jitendra Joshi Instagram Post Filmfare Award : मराठी कलाविश्वात मानाचा पुरस्कार अशी ओळख असलेला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात 'आत्मपॅम्फ्लेट', 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार पटकावला तर सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) म्हणून महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी अंकुश चौधरीला गौरवण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) हा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी (बाईपण भारी देवा) यांना मिळाला. आता या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याबद्दल अभिनेता जितेंद्र जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता जितेंद्र जोशी हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. जितेंद्र जोशीला 'नाळ' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. यानिमित्ताने त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने काही फोटोही पोस्ट केले आहेत. यात तो हातात पुरस्कार घेऊन उभा असल्याचे पाहायला मिळत आहे.
"काल नाळ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याच विभागात माझा जुना मित्र संदीप पाठक सुद्धा "श्यामची आई" या त्याच्या चित्रपटासाठी मानांकित होता, त्याच्यासोबत हा पुरस्कार वाटून घेतला. नाळला सर्वोत्कृष्ट बालकलाकार आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट ( समीक्षक पसंती) पुरस्कार मिळाले. माझे घनिष्ट मित्र नागराज मंजुळे आणि गार्गी कुलकर्णी यांनी मला ही भूमिका दिली आणि माझे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी प्रेमाने ती करवून घेतली. त्यांच्यातील शांतता घेऊन मी फक्त वावरलो आणि जे घडलं त्याला प्रेम मिळतंय. फिल्मफेअर आणि जितेश पिल्लई सर तुमच्या प्रेमासाठी आभारी आहे. अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर तुम्ही नेहमी प्रमाणे कमाल सूत्रसंचालन केलं. वैश्विक शक्तीचे आभार, पृथ्वीमातेचे आभार..", असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे.
जितेंद्र जोशीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. यावर समीर चौघुलेंनी "मनापासून अभिनंदन जितेंद्र जी...खूप अभिमान आणि प्रेम", असे म्हटले आहे. त्यावर जितेंद्र जोशीने "मित्रा हे समीरजी आपल्या मध्ये जीतेंद्रजी ला शोधत आणून वेगळे वागण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना समज दे", असे म्हणत त्याला प्रतिक्रिया दिली आहे. आता यावर समीर चौघुलेंनी "अरे अत्यंत आदराने जी म्हणालो..तुझं काम त्या तोडीचं आहे रे..खूप प्रेम मित्रा", अशी कमेंट केली आहे. सध्या जितेंद्र जोशीची ही पोस्ट व्हायरल होत आहे.