'ठाकरे' विरुद्ध 'मणिकर्णिका...' मुद्द्यावर कंगनाचं लक्षवेधी वक्तव्य

यंदाही वर्षाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटांची मेजवानीच प्रेक्षकांसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Updated: Jan 10, 2019, 07:56 AM IST
'ठाकरे' विरुद्ध 'मणिकर्णिका...' मुद्द्यावर कंगनाचं लक्षवेधी वक्तव्य  title=

मुंबई :  गेल्या वर्षी ज्याप्रमाणे विविध धाटणीच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती, त्याचप्रमाणे यंदाही वर्षाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटांची मेजवानीच प्रेक्षकांसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा या विविध चित्रपटांच्या गर्दीत चर्चा आहे ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आणि राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'ठाकरे' या चित्रपटातील आणि त्याला स्पर्धा म्हणून समोर उभ्या ठाकलेल्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाची. 

काही दिवसांपूर्वीच 'ठाकरे' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरुन वेगळ्याच विषयाने डोकं वर काढलं. 'ठाकरे' प्रदर्शित होणार असल्याच्याच दिवशी कंगना रणौतची मुख्य भूमिका असणारा 'मणिकर्णिका...' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. पण, एकंदर वातावरण आणि राजकीय हवा पाहता 'मणिकर्णिका' आणि त्या दिवशी प्रदर्शनासाठी सज्ज असणाऱ्या इतर चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या निर्धारित तारखा पुढे जाणार का, हाच महत्त्वाचा प्रश्न होता. याचविषयी अभिनेत्री कंगना रणौतने लक्षवेधी वक्तव्य करत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

'ठाकरे' चित्रपटाच्या टीमकडून आपल्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यासाठी कोणताही दबाव टाकण्यात न आल्याचं अभिनेत्री कंगना रणौतने स्पष्ट केलं आहे.  'ठाकरे'च्या टीमकडून कोणीच आपल्याला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यालाठी विचारणा केली नसल्याचं स्पष्ट करत 'मणिकर्णिका'सुद्धा २५ जानेवारीलाच प्रदर्शित होणार असल्याचं  तिने स्पष्ट केलं. मुख्य म्हणजे हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होऊन तितकच चांगलं प्रदर्शन करतील, अशी आशाही तिने व्यक्त केली. 

'मणिकर्णिका- क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याच्या वेळी ती बोलत होती. यावेळी कार्यक्रमाला संगीत दिग्दर्शक त्रिकूट शंकर-एहसान-लॉय, गीतकार-लेखक प्रसून जोशी यांचीही उपस्थिती होती. संगीत अनावरण सोहळ्याची रंगत आणि कंगनाचं हे वक्तव्य सध्या कलाविश्वात चर्चेत असून, आता बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळणार आहे हे खरं.