मुंबई : आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्याची हौस प्रत्येकाला असते. आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठे कष्ट करतानाही दिसतात. काही चाहते अगदी दूरचा प्रवासही करतात. असंच आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्याची हौस एकाला चांगलीच महागात पडली आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला भेटण्यासाठी त्याच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याला जुहू पोलिसांनी अटक केली आहे.
अंकित गोस्वामी असं २२ वर्षीय या चाहत्याचं नाव असून, तो भुवनेश्वरचा राहणारा आहे. अंकितने गूगलवरून अक्षय कुमारचा पत्ता शोधला. बुधवारी अंकीत अक्षय कुमारला भेटण्यासाठी मुंबईतील जुहू परिसरातील बंगल्यासमोर आला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला आत जाण्यास मनाई केली. तरीदेखील त्याने जबरदस्ती बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी मध्यस्ती केली. अंकितने पोलिसांचे काही न ऐकता त्यांच्याशी हुज्जत घातली. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून, न्यायालयानं अंकितची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
दरम्यान, असाच प्रकार सलमान खानसोबतही घडला होता. सलमानची एक चाहती त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहचली आणि ती सलमानची पत्नी असल्याचा दावा करू लागली. तिथेच ती जोर-जोरात मी माझ्या पतीला भेटल्याशिवाय येथून जाणार नसल्याचं ओरडत होती. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी कसंबसं या प्रकरणाला हाताळलं होतं.