'मणिकर्णिका'चे कौतुक न केल्याने कंगना रणौत आमिर आणि आलिया भट्टवर संतापली

हा चित्रपट महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणार होता, मग हे कलाकार पुढे का आले नाहीत?

Updated: Feb 6, 2019, 06:51 PM IST
'मणिकर्णिका'चे कौतुक न केल्याने कंगना रणौत आमिर आणि आलिया भट्टवर संतापली title=

मुंबई: अभिनेत्री कंगना रणौत हिचा 'मणिकर्णिका' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. एकीकडे या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसेंदिवस नवनवे उच्चांक गाठत असताना कंगनाची वक्तव्येही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटाला चांगले यश मिळूनही एक गोष्ट कंगनाला अजूनही सलत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कंगनाने आपल्या मनातील ही खंत बोलून दाखविली. यावेळी कंगनाने अभिनेता आमिर खान, आलिया भट्ट आणि ट्विंकल खन्ना यांना लक्ष्य केले. 'राझी' चित्रपटाच्यावेळी आलियाने मला ट्रेलरची लिंक पाठवली होती व चित्रपट बघायला येण्याचे आमंत्रण दिले होते. ट्रेलर बघून मी स्वत: मेघना गुलजार व आलियाला फोन करून शुभेच्छा दिल्या. माझ्यासाठी तो केवळ एक चित्रपट नव्हता तर देशासाठी त्याग करणाऱ्या सहमत खानची कहाणी होती. मात्र, 'मणिकर्णिका'च्यावेळी इंडस्ट्रीतील कोणत्याही कलाकाराने मला प्रोत्साहन दिले नाही. कदाचित कंगनाचा चित्रपट हिट होईल, या भीतीने त्यांनी तसे केले नसावे, असे कंगनाने म्हटले. 

'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं

यावेळी कंगनाने आमिर खान आणि ट्विंकल खन्नालाही लक्ष्य केले. 'दंगल'च्यावेळी आमिर खानने मला फोन केला होता. त्यावेळी महिला सशक्तीकरणाचा विषय असल्यामुळे मी चित्रपटाला प्रोत्साहन दिले. ट्विंकल खन्नादेखील बऱ्याचवेळा महिला सशक्तीकरणाविषयी बोलत असते. मात्र, 'मणिकर्णिका'च्यावेळी हे दोघेही जण शांत राहिले, असे कंगनाने सांगितले. त्यामुळे आता हे सर्व कलाकार काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 'मणिकर्णिका' या चित्रपटाने नुकताच १०० कोटींच्या कमाईचा टप्पा ओलांडला होता. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत असून तिनेच या चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले आहे.