मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्री असो किंवा टीव्ही इंडस्ट्रीचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सना फॉलो करतात आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष देतात. त्यांचा आवडता स्टार अडचणीत आला तर त्यांचे चाहतेही नाराज होतात. मलायका अरोराच्या चाहत्यांचीही अशीच काहीशी अवस्था झाली आहे. मलायका अरोराच्या कारला नुकताच अपघात झाला होता. त्यानंतर अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
अपघातादरम्यान अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिला 24 तासांपेक्षा जास्त काळ निरीक्षणाखाली ठेवलं होतं. मात्र, आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या अपघातानंतर आता अभिनेत्रीची पहिली झलक समोर आली आहे. वास्तविक, मलाइकाचे रुग्णालयातून डिस्चार्ज देतानाचे अनेक फोटो कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. समोर आलेल्या झलकमध्ये अभिनेत्रीच्या डोक्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे. गुलाबी रंगाच्या पोशाखात ती व्हीलचेअरवर बसलेली दिसत आहे. तिच्या आजूबाजूचे लोकं तिला मदत करतानाही या फोटोत दिसत आहेत.
ट्राफिकमुळे झाला एक्सिडेंट
मलायका अरोराच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितलं की, मलायकाच्या डोक्याला टाके पडले आहेत. पण आता तिला आधीपेक्षा बरं वाटत आहे. अपघाताच्या वेळी, मलायका तिच्या रेंज रोव्हर कारमध्ये एका कार्यक्रमातून परतत असताना मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर टोल प्लाझाजवळ ट्रॅफिकमुळे काही गाड्या एकमेकांवर आदळल्या, त्यापैकी एक मलायका अरोराची कार देखील होती.