''शोले''त धमेंद्रला ''ठाकूर'' साकारायचा होता, ''डॅनी''ला ''गब्बर'' करायचं होतं? पण..बसंती

शोले येण्यापूर्वीच या सिनेमाची स्टारकास्ट निवडण्याच्या कारणांमुळे हा सिनेमा बराच चर्चेत राहिला होता.

Updated: May 10, 2021, 06:52 PM IST
''शोले''त धमेंद्रला ''ठाकूर'' साकारायचा होता, ''डॅनी''ला ''गब्बर'' करायचं होतं? पण..बसंती title=

मुंबई : 'शोले' चित्रपट स्क्रीनवर पहायला जितकी मज्जा येते तितकीच मजेदार या सिनेमाच्या निर्मितीची कहाणी आहे. शोले येण्यापूर्वीच या सिनेमाची स्टारकास्ट निवडण्याच्या कारणांमुळे हा सिनेमा बराच चर्चेत राहिला होता. 'शोले' चित्रपटाची पटकथा सलीम-जावेद यांनी लिहिली आहे. पटकथा लिहिताना कोण कोणती भूमिका साकारणार हे ठरलेलं नव्हतं.

स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी प्रथम संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन यांना कास्ट केलं. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर या दोन्ही कलाकारांना आपल्या कॅरेक्टरला नाही तर गब्बर या कॅरेक्टरला पसंती दर्शवली होती. या दोन्ही कलाकारांना गब्बर या कॅरेक्टरमध्ये इंटरेस्ट होता. पण त्यावेळी गब्बर या कॅरेक्टरसाठी निवड झाली नव्हती.

रमेश शिप्पी यांनी या दोघांनाही स्पष्ट केलं की, चित्रपटाचा गब्बर त्यांच्या दृष्टीने आणखी कोणी तरी आहे. डॅनी त्यावेळी खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. गब्बरची ही भूमिका त्यांना ऑफर करण्यात आली होती. त्याच वेळी डॅनीला देखील ही भूमिका आवडली आणि त्यांनी देखील ही भूमिका साकारण्यास सहमती दर्शविली. काही दिवसांनंतर डॅनी यांनी तारखा नसल्याचं कारण देत या रोलसाठी नकार दिला.

मग काय, गब्बरचा शोध पुन्हा एकदा सुरू झाला. कोणीतरी रमेश सिप्पी यांना अमजद खान यांचं नाव सुचवलं. त्यावेळी अमजद चित्रपट करत नव्हते. ते थिएटर करत होते. त्यांना 'लव्ह अँड गॉड' हा कमी बजेटचा चित्रपट मिळाला असला तरी या चित्रपटाची निर्मिती सुरू झालेली नव्हती. अमजदने ही भूमिका साकारण्यास होकार दिला. अशाप्रकारे, अमजद गब्बर या भूमिकेसाठी निवडले गेले होते, त्यांची ही भूमिका कायमचं लोकांच्या मनात आहे.

गब्बरचा शोध संपल्यानंतर बसंतीच्या निवडीची पाळी आली. बसंती निवडण्यासाठी कोणतीही विशेष समस्या नव्हती. हेमा मालिनी यांना या भूमिकेसाठी घेणार असल्याचे रमेश सिप्पीने आधीच मनापासून ठरवलं होत. हेमा यांनीही ही ऑफर मान्य केली. आता वीरूच्या भूमिकेसाठी शोध सुरु झाला होता. या भूमिकेसाठी धर्मेंद्र यांच्याशी बोलणं सुरु झालं.

पटकथा ऐकल्यानंतर धर्मेंद्र यांना  वीरूऐवजी ठाकूरची भूमिका आवडली. ठाकूर यांच्या भूमिकेसाठी संजीव कुमार यांची आधीच निवड झाली होती. धर्मेंद्र ठाम होते की, त्यांना ठाकूरचीच भूमिका साकारायची आहे.

रमेश सिप्पी यांनी येथे एक युक्ती लढवली. रमेश सिप्पी म्हणाले की, जर तुम्हाला ठाकूरची भूमिका दिली गेली तर वीरूची भूमिका संजीव कुमार करतील. हा नवीन प्रस्ताव ऐकल्यावर धर्मेंद्र यांनी शांतपणे वीरूची भूमिका साकारण्याचं मान्य केलं.

धर्मेंद्र यांना संजीव कुमार आणि हेमा मालिनी ही जोडी नको हवी होती. धर्मेंद्र हे त्या काळात हेमा यांच्या प्रेमात होते. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये  संजीव कुमार आणि हेमा यांच्या नात्याची चर्चा होती. धर्मेंद्र अंतिम होताच चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही जिवंत आहे.