Sameer Chaugule: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता समीर चौघुलेच्या अभिनयाचे आपण सर्वचजण फॅन आहोत. गेली अनेक वर्षे समीर चौघुलेनं आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. नुकताच त्याचा 'जग्गू आणि जुलिएट' हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यानिमित्तानं चित्रपटाच्या प्रमियरच्या वेळी समीर चौघुलेसोबत (Sameer Chaugule) त्याच्या वडिलांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी एका मुलाखतीत समीरबद्दल आपल्याला किती अभिमान वाटतो याबद्दल सांगितले. समीर चौगुले यांच्या 'जग्गू आणि जुलिएट' (Juggu and Juliet) या चित्रपटाची मराठी प्रेक्षकांना आतुरता लागून राहिली आहे.
यावेळी त्यांनी समीर चौगुलेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, प्रेक्षकांकडून आम्हाला समीरविषयी खूपच चांगल्या प्रतिक्रिया येतात. तो खूपच सर्वात्कृष्ट कलाकार आहे. त्याचे लिखाणंही अनेकांना आवडते. आम्हाला हे ऐकून प्रचंड अभिमान वाटतो. त्याच्या चाहत्यांनाही खूप त्याचा अभिमान वाटतो. तो सगळ्यांना इतका हसवतो की आमचं हसून हसून पोटं दुखायला लागते. मला माझे कायम मित्र विचारतात की तुम्ही म्हणजे समीर चौघुलेंचे वडील. त्यामुळे मला समीर चौगुलेमुळे ओळखतात म्हणून मला त्याचा जास्त अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया समीर चौगुलेच्या वडिलांनी दिली.
माझ्या मित्रांच्या लाफ्टर क्लबमध्येही (Laughter Club) मला माझे मित्र विचारतात की तु समीर चौगुलेला आमच्या क्लबमध्ये बोलावं पण समीर इतका बिझी असतो की आम्हालाही एकमेकांना भेटायला वेळ नसतो. घरीही आम्ही एकमेकांशी फार कमी बोलतो. पण समीरनं मेहनत प्रचंड घेतली आहे आणि त्यामुळेच त्याचे फळ त्याला आत्तापर्यंत मिळाले आहे. आज समीरची आई नाही हे त्याचं यश पाहायला त्याचं मला फार जास्त वाईट वाटतं.
त्या मुलाखतीत त्यांना 'जग्गु आणि जुलिएट' या चित्रपटाबद्दल आणि त्यातील समीर चौगुले यांच्या कामाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी आपल्याला मनापासून हा चित्रपट आवडला असल्याचे सांगितले. या चित्रपटातील प्रत्येकाच्या भुमिका फारच सुरेख झाल्या आहेत त्याचसोबत या चित्रपटातील गाणीही खूप सुंदर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्याला स्वत:लाही खूप संगीताची आवड असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आपल्या बाबांसोबत आलेल्या समीरनं आपल्याही भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, आज मी पहिल्यांदा माझ्या वडिलांना एखाद्या प्रमियरला घेऊन आलोय. त्यांनी चित्रपट पाहून जे कौतुक केले ते माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. बाबांना प्रिमियर म्हणजे काय हेही माहिती नव्हतं. पण बाबा आले याबद्दल दुसरा आनंद नाही.