ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान

नुकतात  महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

Updated: Feb 22, 2024, 10:27 PM IST
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान title=

मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. तर मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्र्वगायक श्री. सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला आहे.  

वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता सुरु झाला आहे.  ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. या समारंभास केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पीयूष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. तर, विधानसभा अध्यक्ष ॲड. श्री. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई शहर उपनगर पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती.  

नुकताच ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना २०२३ साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. तर राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुण इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते श्री. मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना जाहीर झाला तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक श्री. जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक श्री. सोनू निगम आणि सन २०२२ साठी श्री. विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला होता. या समारंभात त्यांना सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी केले होते.