Loksabha Election 2019 : 'पीएम. नरेंद्र मोदी' वादाच्या भोवऱ्यात

निवडणूक आयोगाने उचललं हे पाऊल 

Updated: Mar 27, 2019, 11:30 AM IST
Loksabha Election 2019 : 'पीएम. नरेंद्र मोदी' वादाच्या भोवऱ्यात  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आणि राजकारणातीत आतापर्यंतच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या पीएम. नरेंद्र मोदी या बायोपिकच्या वाटेत दिवसागणिक अडचणींची वाढच होत आहे. आचारसंहितेत नमूद करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपांवरुन आगामी लोकसभा निवडणूकांपूर्वी या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवावं अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. त्याच आधारावर निवडणूक आयोगाकडून या चित्रपटाच्या चारही निर्मात्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं. 

'पीएम. नरेंद्र मोदी'चे निर्माते, म्युझिक कंपनी आणि दोन वृत्तपत्रांना या प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे', अशी माहिती एएनआयकडून मिळत आहे. ज्यावर ३० मार्चपर्यंत उत्तर देण्याची मुभा संबंधितांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस उरलेले असतानाच आलेले हे अडथळे दूर करण्यासाठी आता निर्माते काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

५ एप्रिलला मोदींच्या आयुष्यावर भाष्य करणारा पीएम. नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, या चित्रपटाची निर्मिती ही पूर्णपणे राजकीय दृष्टीकोनातून करण्यात आल्याची बाब विरोधी पक्षांकडून उचलून धरण्यात आली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चर्चेत येण्याआधीपासूनच मोदींच्या या बायोपिकचं एक वेगळं वलय निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे. 

अभिनेता विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे. एक सर्वसामान्य घरातील मुलगा ते देशाचा पंतप्रधान असा मोदींचा प्रवास चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ज्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंगही साकारण्यात आले आहेत.