मुंबई : अतिशय दिमाखदार सोहळ्यात पार पडलेल्या Oscars2020च्या मुख्य सोहळ्याने अनेकांनाच थक्क केलं. ऑस्करची नामांकनं जाहीर झाल्यापासून ते अगदी पुरस्कारांची घोषणा होईपर्यंतचा प्रत्येक क्षण हा काळजाचे ठोके वाढवणारा होता. ज्या चित्रपटांना ९२व्या ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं, त्यात सहभागी कलाकारांच्या मनात काहीशा अशाच भावना होत्या. याच भावभावनांचं दर्शन ऑस्करच्या व्यासपीठावर झालं.
अमेरिकेतील डॉल्बी थिएटर येथे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या अखेरच्या टप्प्यात बहुप्रतिक्षित पुरस्कारांची घोषणार करण्यात आली. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनापासून ते अभिनेता आणि अभिनेत्रीच्या नावे प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली. यंदाच्या वर्षी ऑस्करवर वर्चस्व पाहायला मिळालं ते म्हणजे Parasite या कोरियन चित्रपटाचं.
बाँग जून हो दिग्दर्शित हा चित्रपट या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ठरला. सोबतच बाँग जून हो यांनाही त्यांच्या दिग्दर्शन कलेसाठी गौरवण्यात आलं. त्यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हो यांनी व्यासपीठावर येत ज्यावेळी पुरस्कार स्वीकारला तेव्हा एखाद्या अविश्वसनीय विश्वातच आपण असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले.
उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं अभिनंदन केलं. त्याचवेळी त्यांनी थेट ऑस्करच्या मानचिन्हाचे तुकडे करण्याचं वक्तव्य केलं. हो यांचं हे वक्तव्य काहीसं अनपेक्षित होतं. पण, अर्थात पूर्ण वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांच्या म्हणण्याचा संदर्भ लागला.
#Oscars Moment: Bong Joon Ho accepts the Oscar for Best Directing for @ParasiteMovie. pic.twitter.com/b7t6bYGdzw
— The Academy (@TheAcademy) February 10, 2020
Oscars 2020 : ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आभार व्यक्त करतेवेळी हो यांनी आपल्यासह नामांकन मिळालेल्या सर्व दिग्दर्शकांचाही उल्लेख केला. 'ऑस्करकडून मला अनुमती मिळत असेल तर, मी या मानचिन्हाचे पाच तुकडे करुन तुम्हा सर्वांनाही ते देऊ इच्छितो. कारण, तुम्ही सर्व यासाठी पात्र आहात, ज्यांनी अद्वितीय चित्रपट साकारले आहेत', असं ते दिग्दर्शकांना उद्देशून म्हणाले.
कोरियन चित्रपट 'पॅरासाईट'च्या दिग्दर्शकांचं हे वक्तव्य ऐकून सेलिब्रिटींच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवा इतिहासच ऑस्करमध्ये रचण्यात आला.