मुंबई : कोरोना व्हायरसचं सावट अद्यापही दूर झालेला नाही त्यात दुसरीकडे महाराष्ट्रात रायगड आणि कोकणमध्ये 'निसर्गा'चा प्रकोप पाहायला मिळाला. ३ जून रोजी अलिबाग किनारपट्टीजवळ धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. या चक्रीवादळामुळे येथील रहिवाशांचे जीवन १० ते १५ वर्ष मागे गेले आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, घरांची कौलं आणि पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडून गेले. या चक्रीवादळाचा फटका सेलिब्रिटींना देखील बसला आहे.
मराठी कलाक्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या मुळशी इथल्या फार्महाऊसवरही 'निसर्गा'चा कोप झाला आहे. त्याचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून किशोरी शहाणे त्यांच्या मुळशी इथल्या फार्महाऊसवर राहत आहेत.
आपल्या फार्महाऊसचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'आमच्या फार्महाऊसला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. झाडांचं देखील नुकसान झालं आहे. छप्पर उडून गेले आहेत, सगळीकडे अस्त्यावस्त सामान पडलं आहे. नेटवर्क नाही, वीज नाही त्यामुळे काही दिवस संपर्क साधता येणार नाही.' असं लिहिलं आहे.
लॉकडाउन जाहीर झाल्यापासून किशोरी शहाणे त्यांच्या मुळशी इथल्या फार्महाऊसवर राहत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून भारतात लॉकडाऊन आहे. या काळात त्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत आहेत.