मुंबई : सेलिब्रिटी वर्तुळामध्ये नाती जितक्या वेगानं आकारास येतात, तितक्याच वेगानं काही नात्यांमध्ये वादळही येतं. अनेकदा याची कल्पनाही मनात घर करणं अशक्य होऊन जातं. मागच्या काही दिवसांपासून अशाच एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात वादळ आलं आणि चाहत्यांना धक्का बसला.
चार मुलांसह या दोघांचा राजा- राणीचा संसार चांगल्या पद्धतीनं सुरु असतानाच हे सारंकाही घडलं. ही जोडी म्हणजे किम कार्दशियन (Kim Kardashian) आणि लोकप्रिय रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West).
किमसोबतच्या नात्यात आलेल्या दुराव्यानंतर कान्येनं आता आपल्या नावात बदल करत 'ye' इतक्याच नावाला पसंती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवारी त्यानं यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली. कान्येचं पूर्ण नाव कान्ये ओमरी वेस्ट असं आहे.
यापूर्वीही त्यानं नाव बदललं जाण्याचा इशारा दिला होता. 2018 मध्ये त्यानं ट्विटरवर माहिती देत, मी कान्ये वेस्ट या नावाने ओळखलो जातो. पण, मी मुळात 'ye' आहे. कान्ये आणि किमला चार मुलं असून, या चौघांच्याही नावात वेस्टचा उल्लेख आहे. आता, कान्येनंच नावात बदल करायचं म्हटल्यावर त्याचा आणि मुलांचा नावाच्या माध्यमातून असणारा संबंध संपणार आहे.
फेब्रुवारी महिन्यातच कान्ये आणि किमनं घटस्फोटासाठी अर्ज केला होता. बऱ्याच काळापासून ते एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. नात्याला तडा गेला असता तरीही या जोडीमध्ये असणारी मैत्री मात्र कायम आहे. असं असलं तरीही त्यांच्याकडून पुन्हा एकत्र येण्याच्या कोणत्याच वृत्ताला दुजोरा दिला जात नाही.
तिथं किमपासून वेगळ्या झालेल्या कान्येनं इरीना शेकला डेट करण्यास सुरुवात केल्याचं वृत्त समोर आलं होतं. हे वृत्त सेलिब्रिटी वर्तुळात तग धरत नाही, तोच अवघ्या दोन महिन्यांतच या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. या नात्यात कोणत्याही प्रकारचं गांभीर्य नसल्यामुळंच ते पुढच्या वळणावर जाऊ शकलं नाही असं म्हटलं जात आहे.